‘महाविकास’च्या निर्मितीचे प्रतिभाताई पाटील कनेक्शन ! जाणून घ्या संपूर्ण ‘स्टोरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्यात विधानसभा निवडणूका झाल्या आणि जनतेने कोणत्याही पक्षास स्पष्ट बहुमत न देता सगळ्यांना एकमेकांचा आधार घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी भाग पाडले. एकूणच राज्यात त्रिशंकू निवडणूक पहायला मिळाली. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने भाजपाबरोबरची ३० वर्षाची मैत्री तोडली आणि बाजूला पडले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा शिवसेनेला मिळाला परंतु काँग्रेसला मनवणे अवघड असल्याने महाविकास आघाडीची स्थापना होणे जवळपास नाहीत जमा होते. मात्र माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे हे शक्य झालं असल्याचे वृत्त समोर आले आहे. महाविकास आघाडीचे श्रेय हे प्रतिभाताई यांना जात असल्याने त्यासाठी नागपुरात एक कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेबरोबर जाण्यास तयार नव्हत्या. कारण असे केल्याने दक्षिण भारतात काँगेसचा प्रभाव कमी होईल अशी एक विचारधारा काँग्रेस मध्ये होती. मात्र प्रतिभाताईंनी मध्यस्ती करत शिवसेनेच्या राजकीय भूमिकेमुळे काँग्रेसला अनेकदा फायदाच झाला आहे असे त्यांनी सोनिया गांधींना सांगितले आणि महाविकास आघाडीत सामील होण्यासंदर्भात त्यांना तयार केले. खरंतर प्रतिभाताई पाटील आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला साथ दिली होती ही देखील आठवण सोनिया गांधींना करून दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच प्रतिभाताईंनी ही मध्यस्थी केल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री होताच उद्धव ठाकरे यांनी प्रतिभाताई यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले होते. आता महाविकास आघाडीकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रतिभाईताई यांचा सत्कारसोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रतिभाताईंचा विशेष गौरव समारंभ येत्या १९ डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजिला असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे विविध नेते उपस्थित राहणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/