काय सांगता ! होय अन् काँग्रेस फुटली, केवळ 4 नगरसेवक असणार्‍या ‘या’ आघाडीचा झाला महापौर

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – भिवंडीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून महापालिकेत एक हाती सत्ता असणाऱ्या काँग्रेसला या ठिकाणी मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि बंडखोर काँग्रेसच्या मदतीने चार नगरसवेक असणाऱ्या कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील महापौर बनल्या आहेत. भिवंडी महापालिकेत काँग्रेसची एक हाती सत्ता होती. पालिकेत काँग्रेसचे 47 नगरसेवक असूनही काँग्रेसला आपला महापौर विराजमान करता आला नाही.

राज्यात मोदी लाट असतानाही भिवंडीत काँग्रेसने सत्ता राखण्यात यश मिळवले होते. मात्र बंडखोरीमुळे एक हाती सत्तेला सुरुंग लागला आहे. कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील यांना 49 मतं मिळाली तर विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या रिषिका राका यांना 41 मतं मिळाली. काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटल्याने काँग्रेसला भिवंडी महापालिकेत मोठा धक्का बसला आहे.

महापालिकेत काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्यासाठी कोणार्क विकास आघाडीने मोठी फिल्डींग लावली होती. यामध्ये कोणार्क आघाडीला यश आले असून आघाडीचा महापौर विराजमान झाला आहे. महापौरपदासाठी काँग्रेसकडून रिषिका राका, कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील, तर शिवसेनेच्या वंदना काटेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसने रिषिका राका यांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी केला होता. मात्र, व्हीपला न जुमानता काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने प्रतिभा पाटील यांचा विजय झाला.

दरम्यान, उपमहापौरपदी काँग्रेसचे बंडखोर इमरानवल्ली यांची निवड झाली आहे. त्यांना 49 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात उभे असलेले शिवसेनेचे बालाराम चौधरी यांना 41 मतं मिळाली. शिवसेनेचे फक्त 12 नगरसेवक असतानाही राज्यात झालेल्या महाविकास आघाडीमुळे शिवसेनेच्या चौधरी यांना 41 चा आकडा गाठता आला.

महापालिकेतील पक्षीय बलाबल
काँग्रेस – 47
शिवसेना – 12
भाजप – 20
कोणार्क विकास आघाडी – 4
समाजवादी पार्टी – 2
आरपीआय (एकतावादी)- 4
अपक्ष – 1