प्रवीण गायकवाड यांनी घेतल्या कॉंग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या उमेदवारीच्या चर्चेत असलेले प्रवीण गायकवाड यांनी गुरुवारी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

काँग्रेस पक्षाच्या वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून गायकवाड यांचे नांव उमेदवारीसाठी चर्चेत आले आहे. यावरून पक्षात मतमतांतरे मांडली जात आहेत. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी गुरुवारी स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्याला महत्त्व आले आहे. काँग्रेस भवनातही गायकवाड यांनी संपर्क साधला.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस समितीने माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांच्या नांवाची शिफारस केली आहे. याखेरीज खासदार संजय काकडे हेही काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असून त्यांनीही काँग्रेसचे स्थानिक नेते शिवाय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भेटी घेतल्या आहेत. काँग्रेस पक्षात पाच जण इच्छुक झाल्याने उमेदवारीसाठीची चुरस वाढली आहे.