‘या’ कारणामुळे प्रविण गायकवाड यांची पुण्याच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर प्रविण गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे प्रविण गायकवाड यांनी जाहीर केले. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला प्रवेश देण्यासाठी काँग्रेसला वेळ आहे मात्र माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांसाठी वेळ नाही असे म्हणत प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले, ‘ काँग्रेस पक्षाकडून अद्याप पुणे मतदार संघासाठी उमेदवाराची घोषणा झाली नाही. या काँग्रेस पक्षाला आमचे विचार चालतात, काम चालते पण उमेदवारी चालत नाही. त्यामुळे मी माझी उमेदवारी मागे घेतली आहे. या पुढे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे सांगितले तसेच ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत राज्यातील इतर जागांवर काँग्रेसला आयात उमेदवार चालतात. तर मी मागील कित्येक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम केले असताना देखील उमेदवारी नाकारल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान पुणे मतदार संघातील उमेदवारासाठी प्रवीण गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तसेच मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून पुणे आणि रावेर मतदार संघात उमेदवार ‘एक्सचेंज’ करणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. मात्र, याबाबत दोन्ही पक्ष्याकडून बोलण्यास नकार देण्यात येत आहे. निवडणुका तोंडावर आल्या असताना अखेर काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे नाराज झालेल्या प्रविण गायकवाडांनी आपली मन की नाराजी व्यक्त केली. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला प्रवेश देण्यासाठी काँग्रेसला वेळ आहे मात्र माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांसाठी वेळ नाही म्हणून उमेदवारीच्या स्पर्धेतून गायकवाड यांनी माघार घेतली आहे ?