पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pravin Darekar On Sharad Pawar | उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जीएसटी कौन्सिलच्या दोन बैठकांना गेले नाहीत (GST Council Meeting) , ही वस्तुस्थिती आहे. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सातत्याने भेट घेवून जीएसटी संदर्भात व्यापाऱ्यांच्या अडचणी त्यांच्या कानावर घालत असतात, असा दावा करतानाच शरद पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडे कुठलाच मुद्दा नसल्याने उचकवण्यासाठी जीएसटी चे नरेटीव्ह सेट करत आहेत असा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी बारामती येथे व्यापाऱ्यांनी जीएसटी संदर्भात त्यांच्याकडे केलेल्या तक्रारीवर बोलताना राज्याचे अर्थमंत्री या नात्याने अजित पवार यांना धारेवर धरले. राज्याचे अर्थमंत्री जीएसटी कौन्सिल च्या बैठकांना स्वतः उपस्थित रहात नसल्याने व्यापाऱ्यांचे प्रश्न मांडले जात नाहीत. अधिकारी बैठकांना उपस्थित असतात. परंतु बैठकांमध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार नसतो, त्यामुळे हे प्रश्न मांडले जात नाहीत असा आरोप ही पवार यांनी केला.
यासंदर्भात प्रवीण दरेकर यांना विचारणा केली असता, ते म्हणाले राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे दोन बैठकांना उपस्थित नव्हते ही वस्तुस्थिती आहे. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत असतात. त्यावेळी ते जीएसटी आणि व्यापाऱ्यांच्या अडचणींबाबत चर्चा करत असतात.
खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सध्या कुठलाच मुद्दा नसल्याने त्या जीएसटी बाबत फेक नरेटीव्ह तयार करत आहेत. शरद पवार हे त्यांचे ऐकून खोटं बोलत आहेत, असा आरोप दरेकर यांनी केला.
महाविकास आघाडी सरकार (MVA Govt) असताना केंद्र सरकार जीएसटी परतावा देत नसल्याबद्दल आरोप करत होते. महायुती सरकारच्या काळात केंद्रं सरकारने परताव्याचा महाराष्ट्राचा हिस्सा दिला आहे असा दावा करताना मात्र दरेकर हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सध्याचे अर्थमंत्री अजित पवार हेच अर्थमंत्री होते हे विसरून गेले.
भाजपने दाऊद सोबतच्या कथित संबंधावरून नवाब मलिक यांच्यावर आरोप केले आहेत. त्याच मलिक यांना अजित पवार यांनी अधिकृत उमेदवारी दिली आहे. महायुती म्हणून त्यांचा प्रचार करणार का ? याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले महायुती टिकवायची म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात. परंतु मलिक यांना उमेदवारी दिली त्याठिकाणी आम्ही शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहोत. भाजप मलिक यांच्या प्रचारात सहभागी होणार नाही असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी मलिक यांनी निवडणुकीनंतर शिंदे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याबाबत केलेल्या वक्तव्यावर दरेकर म्हणाले मलिक यांनी यापुढे भविष्य सांगण्याचा व्यवसाय करावा.