पहिल्यांदाच मिशी कापली, फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठीच

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या मनावर राज्य करणाऱ्या दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने बाळासाहेबांची भूमिका वठविली असून त्याने तो खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची भूमिका जगला. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली आहे.  या चित्रपटामध्ये मराठी अभिनेता आणि निर्देशक प्रविण तरडेंनी देखील महत्वाची भूमिका वठविली असून त्यांनी या चित्रपटाविषयीच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

दत्ताजी साळवींच्या भूमिकेत प्रवीण तरडे
‘ठाकरे’ हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील तब्बल ११ कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये प्रविण तरडे यांनी कामगार नेते दत्ताजी साळवी यांची भूमिका वठविली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रविण यांनी या चित्रपटाविषयीच्या काही आठवणी फेसबुकवर शेअर केल्या आहेत. विशेष म्हणजे केवळ या चित्रपटासाठी मिशा कापल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘ठाकरे’ चित्रपटामध्ये दत्ताजी साळवी यांच्या भूमिकेला न्याय देताना त्यांच्याप्रमाणे प्रत्येक गोष्टी आत्मसात करणं गरजेचं होतं. त्यामुळे दत्ताजी यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी प्रविण यांना मिशी कापणं गरजेचं होतं. ही भूमिका योग्यरित्या पार पाडावी यासाठी प्रविण यांनी पहिल्यांदाच त्यांची मिशी कापली. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बाळासाहेबांसाठी पहिल्यांदाच मिशी कापल्याचं त्यांनी म्हटलं.