दलित बांधवांनो मला माफ करा, ’त्या’ वादग्रस्त डेकोरेशनवरून प्रवीण तरडेंचा माफीनामा

पोलीसनामा ऑनलाईन, पुणे, दि. 22 ऑगस्ट : कोरोना असला तरीही यंदा गणेशोत्सव घरोघरी आणि मंडळातही साजरा केला जातोय. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आरास बनविली जात असते. यात सेलिब्रिटी, क्रिकेटर, नेते आदी मागे नसतात. मात्र, यंदा दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे चांगलाच वादात सापडला आहे. तरडे यांनी त्यांच्या घरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. परंतु घरात बाप्पासाठी त्यांनी केलेला देखावा अतिशय वादग्रस्त ठरला. याबाबत प्रवीण तरडेंनी जाहीरपणे माफी देखील मागितली आहे.

दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांनी त्याच्या कल्पकतेतून यंदा पुस्तकी गणपती हा देखावा केला होता. त्यानंतर त्यांनी हे फोटो सोशल मीडियार शेअर केले. मात्र, या पुस्तकी देखाव्यात प्रवीण तरडेंनी भारताचे संविधानाची प्रत ठेवली होती. या भारतीय संविधानच्या प्रतवर पाट ठेऊन त्यावर गणेशमूर्ती ठेवली होती. त्यामुळे हा प्रवीण तरडेंनी शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर वादग्रस्त ठरला. भारतीय संविधानच्या प्रतवर गणेशमूर्ती ठेवल्याने आंबेडकरी जनता आणि संविधानप्रेमींसह नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. प्रवीण तरडेंनी या शेअर केलेल्या फोटोवर आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार टीका करून धडा शिकविण्याचा इशारा देखील दिला आहे.

प्रवीण तरडेंच्या चाहत्यांनी तरडेंला प्रचंड ट्रोल केलंय. त्याच्यावर राज्यभरातून टीका होऊ लागलीय. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत प्रवीण तरडे यांनी माफी मागाणी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रवीण तरडेंनी जाहीर माफी मागून त्याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच सोशल मीडियावर शेअर केलेला तो फोटो देखील आणि त्यांची ती पोस्ट देखील डीलिट केलीय.

याबाबत प्रवीण तरडे म्हणाले की, ’माझ्या घरी यंदा गणेश बाप्पासाठी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सर्वात मोठं प्रतिक अशी माझी भावना होती. असे असलं तरी मी केलेली चूक अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिली. आरपीआय, भीम आर्मी तसेच लातूर आणि पुण्यातील संघटनांनी मला याची जाणीव करुन दिली. मी सर्व दलित बांधवांची, ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांची सर्वांचीच जाहीर माफी मागतो’, असे प्रवीण तरडे यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हंटलं आहे.