कुंभमेळा सुरु होण्यापूर्वीच भीषण आग ; अनेक तंबू बेचिराख 

वृत्तसंस्था : प्रयागराज येथे आज  हजारो साधूंचा मेळा जमा झाला आहे. उद्यापासून म्हणजे संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच तेथे भीषण आग लागल्याची माहिती मिळते आहे. या आगीमुळे एकच धावपळ उडाली असून अनेक तंबू या आगीत जळून भस्मसात झाले आहेत. ही आग दिगंबर आखाड्यात ही आग लागल्याची माहिती आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण  मिळवण्यात यश मिळाले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कुंभ मेळ्यात संक्रांतीला उद्या पहिले शाही स्नान होणार आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कुंभ मेळ्याच्या परिसरात सेक्टर १६ मधील दिगंबर आखाड्यात ही भीषण आग लागली. सिलिंडरमधील गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती आहे. स्फोट होताच अनेक तंबू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, अशी माहिती एका साधूने दिली. आगीवर नियंत्रण मिळण्यात आलं आहे. तसंच आगीनंतर आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती कुंभ मेळ्याचे सुरक्षा अधिकारी आशुतोष मिश्रा यांनी दिली.
कुंभ मेळ्यासाठी देश आणि परदेशातून मोठ्या संख्यने साधू आले आहेत. यासाठी प्रयागराजमध्ये पूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्रिवेणी संगमावर साधूंच्या वेगवेगळ्या आखाड्यांचे तबू लावण्यात आले आहेत. हजारो साधू येथे दाखल झाले आहेत.
प्रयागराज कुंभ मेळ्यात डिलक्स  तंबू 
एकही कपडा अंगावर परिधान न केलेले आणि सर्व मोह मायांचा त्‍याग केलेले साधू मोठ्या संख्येने या कुंभमेळ्याला येत असतात. पण अशा त्‍यागी साधुंसाठी प्रयागराजमध्ये अलिशान तंबू उभारण्यात आले आहेत. या तंबूत राहण्यासाठी एका रात्रीचा दर तब्‍बल ३५ हजार रुपये आहे. कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध ठिकाणी अलिशान तंबू उभारण्यात आले आहेत. हे तंबू सर्व सोयी-सुविधांनी युक्त आहेत. ३५ हजारांच्या या तंबूत अशा सुविधा आहेत ज्‍या, फाईव्ह स्‍टार हॉटेलमध्येही नसतील. असे तंबू येथे उभारण्यात आल्याची माहिती होती.
प्रयागराज येथे फाईव्ह स्‍टार हॉटेलची संख्या कमी आहे. जी हॉटेल आहेत ती, आधीच व्हीआयपी आणि राजकीय नेत्‍यांनी  बुक केली आहेत. त्‍यामुळे उत्‍तर प्रदेश सरकारने हितकारी प्रॉडक्‍शन आणि क्रियेशनसोबत तंबुंची ‘इंद्रप्रस्थम’ सीटी उभा केली आहे.