कुंभमेळ्‍यात योगी आदित्‍यनाथांच्या तंबूला आग, 2 तंबू जळून खाक

प्रयागराज : वृत्तसंस्था – प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या तंबूला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आज मंगळवारी(दि- 5) ही आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. काही वेळेतच सदर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. सदर आग लागल्याची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी एकच गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले.

कुंभमेळ्‍यातील सेक्टर १५ मध्‍ये उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्‍या नाथ सांप्रदायिकांचा तंबू आहे. याच तंबूला आज सकाळी आग लागली. या आगीत दोन तंबू जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे अशी माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाने मोठ्या कष्टाने ही आग आटोक्यात आणली आहे.

पोलिस अधिकारी प्रमोद शर्मा हे घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. याबाबत बोलताना प्रमोद शर्मा म्हणाले की, “या आगीत तंबूतील खुर्च्या, सोफा जळून खाक झाले. त्‍यामुळे तंबूंनी पेट घेतली. सुदैवाने आतापर्यंत या आगीत जीवितहानी झालेली नाही. आग आटोक्‍यात आणण्‍यात अग्निशमन विभागाला यश आले आहे.”