यमुनेत बुडालेल्या ७ जणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन – अस्थी विसर्जनासाठी प्रयागराज येथील यमुनेत गेलेल्या नांदेड व परभणी येथील सातजणांना बोट उलटल्याने जलसमाधी मिळाली होती. हे सात मृतदेह व बचावलेल्या नातेवाईकांना घेऊन वायुसेनेचे विशेष विमान नांदेड येथील विमानतळावर आले. यानंतर हे मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतले. सातपैकी तीन मृतदेह कोलंबी, १ माकणी तर अन्य तीन मृतदेह परभणी येथे तात्काळ रुग्णवाहिकेने रवाना करण्यात आले. रात्री उशीरा शोकाकुल वातावरणात सर्व मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नायगाव पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश बैस यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते. त्यांच्या अस्थी घेऊन बैस यांच्या कुटुंबातील चौदा सदस्य प्रयागराज येथे गेले होते. यमुना नदीत अस्थी विसर्जित करून परतत असतान त्यांची बोट उलटली व सातजण बुडुन मरण पावले. दिगंबर बैस ७५, बालाजी बैस ५०, भोजराज सिसोदे ७०, भागाबाई कच्छवे ६५, राधाबाई कच्छवे ५५, लक्ष्मी कच्छवे ५५ व डॉ. देवीदास नारायणराव कच्छवे ५५ (ह.मु.व्यंकटेशनगर नायगाव जि.नांदेड) हे सातजण मरण पावले. उर्वरित सात जणांना एनडीआरएफ व एसडीआरएफचे जवान व स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करुन सुरक्षित पाण्याबाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशात संपर्क साधून मदतकार्य करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच मृतदेह व बचावलेल्या नांदेडात आणण्यासाठी विशेष विमान पुरविण्याची मागणी केली. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन पुढील प्रक्रियेसाठी संपर्क साधून होते. तसेच भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश पवार हे काही नातेवाईकांना सोबत घेवून हैदराबाद मार्गे प्रयागराज येथे पोहोचले. वायुसेनेने विमान उपलब्ध करुन दिले असून ते १२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नांदेडात येथे दाखल होणार असल्याची प्रारंभीक माहिती मिळाल्याने दुपारपासूनच विमानतळावर ८ रुग्णवाहिका व पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रत्यक्षात वायुदलाचे विमान नांदेड विमानतळावर दाखल झाले. दुर्घटनेत मृत पावलेल्या सात जणांचे मृतदेह विमानतळावर दाखल होताच उपस्थित नातेवाईकांनी आक्रोश केला.

माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन