उन्हाळ्यात गरोदर महिलांनी घ्यावी ‘ही’ काळजी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उन्हाळ्यात गरोदर महिलांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत गरोदर महिलांना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मुळात गरोदर महिलांमध्ये कमी रक्तदाबाची समस्या दिसून येते. कडक उन्हामुळे ही समस्या बळावू शकते. गरोदरपणात डिहायड्रेशनची समस्याही दिसून येते. अशा अवस्थेत पोटात बाळ असल्याने महिलांनी स्वतःला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावं.

उन्हामुळे शरीरात सोडियम आणि पोटॅशियमची कमतरता निर्माण होऊ शकते. अशावेळी गरोदर महिलांना हात किंवा पायांमध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते. काहीवेळा कडक उन्हामुळे हिट स्ट्रोकचा देखील धोका असतो. यावर एकच उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणं. गरोदर महिलांनी दिवसाला कमी कमी दोन ते अडीच लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. आहारत प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

डिहायड्रेशन, कमी रक्तदाबाचा त्रास, युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन (मूत्रमार्गातील जंतूसंसर्ग), सन स्ट्रोक, सर्दी, खोकला, ताप या समस्या उन्हाळ्यामध्ये गरोदर महिलांमध्ये दिसून येतात. यासाठी उन्हाळ्यात गरोदर महिलांनी काळजी घ्यावी. जास्त कडक उन्हात जाऊ नये. शक्यतो ११-४ या काळात घराबाहेर पडू नये. ज्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण अधिक आहे. अशा फळांचा आहारात समावेश करावा. घराबाहेर पडताना ओढणी किंवा स्कार्फचा वापर करावा. मीठाचं प्रमाण कमी ठेवावं. घट्ट कपडे घालू नका. शक्यतो कॉटनचे कपडे घालावेत.