टर्म इन्शुरन्स घेताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

मुंबई : वृत्तसंस्था – टर्म इन्शुरन्स हा आयुर्विम्यातील एक प्रमुख विमा प्रकार आहे. टर्म इन्शुरन्स प्रकारात विमेदार, पॉलिसीच्या मुदतीमध्ये विम्याचे हप्ते भरून संरक्षण मिळवतो. या कालावधीत विमेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना रक्कम मिळते; मात्र मुदतीनंतर विमेदार हयात असल्यास कुठलीही रक्कम परत मिळत नाही.

कमी रकमेच्या हप्त्याच्या बदल्यात भरघोस विमाकवच हे या विम्याचे वैशिष्ट्य आहे. टर्म इन्शुरन्समधून अन्य आर्थिक परतावा मिळत नसल्याने यातून मिळणारे विमाकवच हे अन्य विमा पॉलिसींच्या तुलनेत कितीतरी अधिक असते. आयुर्विम्यातून ज्या प्रकारचे विमाकवच अपेक्षित असते ते उद्दिष्ट टर्म इन्शुरन्समधून साध्य होते.

टर्म इन्शुरन्स घेताना कोणती काळजी घ्याल –

गरजेनुसार विमा ठरवा –

विमा अनेक प्रकारचे असतात. त्यामुळे तुमची नेमकी गरज काय हे ठरवून मग कोणता विमा घ्यायचा हे निश्चित करा. वाढत्या वयासोबत व्यक्तीची विम्याची गरजही वाढते. काही विमा कंपन्या अशा योजना सादर करतात जे विमा राशीत वृद्धी किंवा घट यासह येतात. आयुर्विमा जो व्यक्‍तींच्या जीवनाचा विमा उतरवितो व दुसरा सर्वसाधारण विमा यात आग, वाहन, संपत्ती, मशीन, दुकाने, घर, महागाची आभूषणे यांचा समावेश असतो. अपघात विमा, आरोग्य विमा आदी विम्यांचे प्रकार आहेत.

ऑनलाईन तुलना करा –

टर्म इन्शुरन्सचे प्रीमियम ३ फॅक्टरवर आधारित आहे. वय, कव्हरेजची रक्कम आणि टर्म. समान वयाच्या २ व्यक्तींची अवधि, कव्हर, प्रीमियम राशि वेगवेगळी राहू शकते. त्यामुळे टर्म इन्शुरन्स घेण्यापूर्वी ऑनलाईन तुलना करा.

नॉमिनीचे डिटेल्स भरणे महत्वाचे –

हे टर्म इन्शुरन्समध्ये सर्वात महत्वपूर्ण आहे. ज्या व्यक्तीने विमा काढलेला आहे जर दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर त्याने विम्यामध्ये ज्या व्यक्तीला नॉमिनी केले आहे त्याला विम्याची रक्कम मिळते. त्यामुळे विमा घेताना नॉमिनीचे डिटेल्स भरणे गरजेचे आहे.

अतिरिक्त टर्म इन्शुरन्स –

किमान कव्हर हे प्रत्येक वेळेस विमाधारकांच्या गरजेनुसार वेगवेगळे असू शकते. असे म्हटले जाते की कमवणाऱ्या सदस्याचे वार्षिक उत्पन्न किमान विम्याच्या १० पट असायला हवा. जशी जशी तुमच्या उत्पन्नात वाढ होते त्याच प्रमाणात कव्हरही वाढवायला हवे आणि अतिरिक्त टर्म इन्शुरन्स पण घ्यायला पाहिजे.