अरे देवा ! पुण्यातून पायी निघालेल्या गर्भवतीची रस्त्यात ‘प्रसूती’

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे संचारबंदी वाढल्यानंतर नऊ महिन्यांची गर्भवती, तिचा नवरा, तीन वर्षांंची मुलगी आणि इतर दोन परिवारातील 13 जण   पुण्याहून यवतमाळ जिल्ह्यातील गावाकडे पायी चालले होते.  दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटानजीक गर्भवतीला प्रसव कळा सुरू झाल्या.त्यानंतर काही वेळात तिने रस्त्यावरच  बालिकेला जन्म दिला. यवतमाळसह अहमदनगरमधील काही देवदूत तिच्या मदतीस धावले. शनिवारी हे कुटुंब यवतमाळ जिल्ह्यातील वागद (ता. महागाव) या मूळगावी पोहचले.

पुण्याहून यवतमाळकडे जात असताना निर्मला (नाव बदलले) या महिलेस पायदळ प्रवासात प्रसव वेदना सुरू झाल्या. तिने रस्त्यावरच मुलीलास जन्म दिला. ही बाब रस्त्याने जात असलेले डॉ. अविनाश काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी  महिलेला स्वत:च्या वाहनातून अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्या व बाळाच्या सर्व तपासण्या केल्या. नवजात बाळ व महिला दोघीही सुरक्षित आहेत. हे कुटुंब पुण्याहून यवतमाळला जात असल्याचे कळल्यावर डॉ.  काळे यांनी ही बाब यवतमाळातील जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अनिल गायकवाड यांना सांगितली. गायकवाड यांनी या कुटुंबास यवतमाळला नेण्याची जबाबदारी घेतली. गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनास घटनेची माहिती देऊन प्रवासाची परवानगी मागितली. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वर्‍हाडे यांच्या पुढाकाराने वाहन परवानगी मिळाल्यावर नवजात बाळासह काळे कुटुंब शनिवारी रुग्णवाहिकेने यवतमाळात पोहचले. येथे अनिल गायकवाड व मित्रांनी या परिवारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून सर्वांची आरोग्य तपासणी केली. सुट्टी झाल्यानंतर हे सर्वजण वागद या मूळगावी रवाना झाले.