कौतुकास्पद ! नवजात बाळाची आई ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मैत्रिणीने 11 दिवसाच्या बाळाला दिली मायेची ऊब

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात माणुसकी लोप पावत आहे की काय, अशी भीती व्यक्त होत असाताना सांगली जिल्ह्यातील केडगावमध्ये माणुसकी पहायला मिळत आहे. एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिच्या नवजात बाळाला अकरा दिवसांपासून शेजारी राहणारी मैत्रीण सांभाळत आहे. यामुळे अद्यापही माणुसकी जीवंत आहे, याचा प्रत्यय आला. केडगाव येथील एक विवाहिता ऐश्वर्या अनिकेत वेल्हाळ या आपल्या शेजारच्या मैत्रिणीच्या नवजात बाळाला सध्या मायेची उब देत आहेत. ऐश्वर्या यांनी जपलेल्या माणुसकीचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

केडगाव शहरातील आझाद चौकात ऐश्वर्या वेल्हाळ या आपल्या कुटुंबीयासोबत राहतात. तर त्यांच्या शेजारी रहात असलेल्या एका कुटुंबातील पाचपैकी बाळाच्या आईसह तिघाजणांना कोरोनाची लागण झाली आहे. या बाळाची आई ही कोरोनाबाधित असताना त्यांना कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात कन्यारत्न प्राप्त झाले. आई कोरोनाबाधित तर निरोगी बाळाची तब्येत नाजूक असल्याने नवाजत बाळाला हॉस्पिटलमध्ये 11 दिवस काचेमध्ये ठेवले. त्यानंतर मातेला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी डॉक्टरांनी बाळाला कोरोनाबाधित मातेपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बाळाच्या आईने आपल्या शेजारी राहणारी मैत्रीण ऐश्वर्या वेल्हाळ यांना आपल्या बाळाचा सांभाळ करण्याची विनंती केली. ऐश्वर्या यांना कोणताही विचार न करता 11 दिवसांच्या बाळाचा संभाळ करण्याचे मान्य केले.

ऐश्वर्या वेल्हाळ यांनी घेतलेल्या निर्णयाला पती अनिकेत व सासरे बाळासाहेब वेल्हाळ यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने सहमती दर्शवली. अशारीतीने ऐश्वर्या या संबंधित बाळाचा अकराव्या दिवसांपासून ते आज वीस दिवस झाले सांभाळ करीत आहेत. त्या बाळाला दररोज न्हाऊ-खाऊ घालत त्याला आईचे प्रेम देत आहेत. बाळाची किरकोळ आरोग्याची तक्रार निर्माण झाली तरी त्याला दवाखान्यात नेणे, औषधोपचार करणे ही सर्व कामे त्या करत आहेत. त्यांच्या मायेच्या व प्रेमाच्या सावलीत बाळाने चांगलेच बाळसे धरले आहे. संकटाच्या काळात ऐश्वर्या यांनी एका मातेला मदत करुन सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे.