सलाम ! हिमवृष्टीत अडकलेल्या गर्भवतीला अशी केली जवानांनी मदत

श्रीनगर : वृत्तसंस्था – हिमवृष्टीत अडकलेल्या गर्भवती महिलेला लष्कराच्या जवानांनी सुखरुप रुग्णालयात पोहोचवण्याचे काम केले आहे. जवानांनी खूप वेळेवर महिलेला रुग्णालयात दाखल केले. वेळेवर रुग्णालय गाठल्यानंतर महिलेची प्रसूती झाली. आनंदाची बाब म्हणजे या महिलेने त्यानंतर जुळ्यांना जन्म दिला. जवानांनी केलेल्या मदतीसाठी तिने त्या जवानांचे आभारही मानले. काश्मीरच्या बांदिपोरात ही घटना घडली आहे.

बांदिपोरातील एका ग्रामस्थाला आपल्या पत्नीला रुग्णालयात न्यायचे होते. या भागात प्रचंड हिमवृष्टी होती. त्यामुळे सदर ग्रामस्थाने लष्करी तळावर शुक्रवारी कॉल केला. पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी मदत करा, असं आवाहन केलं. जोरदार हिमवृष्टीमुळे बांदिपोरातील तापमान उणे सात अंश सेल्सिअस होतं. ‘बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक ठप्प होती. अशा स्थितीत जवान ग्रामस्थाच्या पत्नीच्या मदतीला धावून आले. महिलेला काहीही करून रुग्णालयात दाखल करणे खूप गरजेचे होते. अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वाहतूक ठप्प असल्याने लष्काराच्या जवानांनाही अडचण आली. बांदिपोरा राष्ट्रीय रायफल्सचे जवान चालत महिलेच्या घराजवळ पोहोचले. ग्रामस्थाच्या फोन कॉलनंतर लष्करानं वेगानं सूत्रं हलवली. जवान महिलेच्या घराजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला स्ट्रेचरवर ठेवलं आणि तब्बल अडीच किलोमीटरचं अंतर पायी कापलं. जवळजवळ कमरेइतका बर्फ रस्त्यावर साचला होता. यानंतर महिलेला लष्कराच्या रुग्णवाहिकेतून बांदिपोरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

‘आम्ही प्रशासनाशी संवाद साधला. लष्कर आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे महिला रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करुन देण्यात आले. तिथे या महिलेनं जुळ्यांना जन्म दिला’ अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.