उल्हासनगर : गर्भवती महिलेचा रिपोर्ट 2 दिवसात ‘निगेटिव्ह’, ‘कोरोना’ अहवाल देणाऱ्या लॅबवर प्रश्नचिन्ह

उल्हासनगर : पोलीनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाची चाचणी करण्यासाठी खाजगी लॅबला परवानगी दिली आहे. मात्र, खाजगी लॅबकडून देण्यात येणाऱ्या अहवालावर आता प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. एका गर्भवती महिलेचा कोरोना रिपोर्ट दोन दिवसात निगेटिव्ह आल्याने, कोरोना अहवाल व कोरोना स्वॅब तपासणी करणाऱ्या लॉबने याच महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिल्याने खाजगी लॅबच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी महापालिकेकडे केली जात आहे. उल्हासनगर कॅम्प-3 शांतीनगर परिसरातील राहणाऱ्या एका 22 वर्षीय गर्भवती महिलेला सावधगिरी म्हणून त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार या महिलेने गौलमैदान येथील स्थानिक लॅबमध्ये जाऊन 11 जुलै रोजी कोरोना चाणीसाठी स्वॅब दिला. 12 जुलै रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, महिलेसह कुटुंबाला धक्का बसला. कोणतेही लक्षण नसताना कोरोना अहवाल कसा पॉझिटिव्ह आला असा प्रश्न कुटुंबाला पडला. त्याच दिवशी 12 जुलैला महापालिका आरोग्य विभागाने पथक उपचारासाठी कोरोना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी महिलेच्या घरी पोहचले. महिलेसह कुटुंबानी महापालिका आरोग्य पथकाला पुन्हा कोरोना चाचणी करतो असे सांगून परत पाठवले. 13 जुलैला महिलेला कुटुंबाने पूर्वीच्याच लॅबमध्ये फोन करून स्वॅब घेण्यासाठी घरी बोलावले.

दरम्यान, कुटुंबाने दोन दिवसांपूर्वी तुमच्याकडेच कोरोनाची चाचणी केल्याचे सांगितले नाही. स्थानिक लॅबने 14 जुलै रोजी महिलेचा स्वॅबचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल देणाऱ्या लॅबने त्याच महिलेच्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगितले. यामुळे धक्का बसलेल्या कुटुंबाने घडलेला प्रकार समाजसेवक नासीर खान यांच्या कानावर घातला. नासिर खान यांनी महापालिका आरोग्य विभागाला झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मोहनालकर यांनी माहिती घऊन कारवाई करण्याचे संकेत दिले. डॉक्टर, लॅब व रुग्णालय यांची एक साखळी निर्माण झाली असून रुग्णाची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप नासिर खान यांनी केला आहे.