Coronavirus Impact ; ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना ‘कोरोना’मुळं ‘ती’ अडचण

पुणे : प्रतिनिधी – ग्रामीण भागातील महिलांना आजही आरोग्य सुविधा मिळत नाहीत. कोरोना व्हायसरचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात. अनेक हॉस्पिटल आणि डिस्पेन्सरी बंद आहेत. त्यामुळे गर्भवती महिलांची परवड होत असल्याचा प्रकार वरवंड (ता. दौंड) येथे उघडकीस आला.

कोरोनाच्या महामारीमध्ये गर्भवती महिलांना अनेक संकटांशी सामना करावा लागत आहे. वरवंड (ता. दौंड) येथील गर्भवती महिला खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. तिची प्रसुतीची तारीख जवळ आली. त्यामुळे त्यांनी उपचार सुरू असलेल्या डॉक्टरांना फोनवरून माहिती दिली. मात्र, डॉक्टरांनी लॉकडाऊनमुळे दवाखाना बंद असल्याचे सांगून जबाबदारी झटकून टाकली. त्यानंतर इतरही अनेक डॉक्टरांशी संपर्क केला, मात्र कोणीही दखल घेतली नसल्याने कुटुंबीयही हतबल झाले.

दरम्यान, पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जाण्याची माहिती मिळाली. मात्र, तेथे गेल्यानंतर त्यांनीही ससून रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र, ससून रुग्णालयातही बेड शिल्लक नसल्याचे सांगितले. दरम्यान, हडपसरमधील साने गुरुजी रुग्णालयामधील सोशल वर्कर स्वाती पवार यांच्याशी अ‍ॅड. लक्ष्मी माने आणि नीता भोसले यांनी संपर्क केला. पवार यांनी गर्भवती महिलेची माहिती घेऊन डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर गर्भवती महिलेची कोव्हिड-19 ही तपासणी साने गुरुजी रुग्णालयातच केली जाईल. त्यानंतर प्रसुतीसाठी सुद्धा मदत केली जाईल, असे साने गुरुजी रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आल्याचे गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले.