गर्भवती महिलांना सतावते नोकरी गमावण्याची भीती

पोलीसनामा ऑनलाइन – नोकरी करणाऱ्या महिलांसाठी गर्भावस्था म्हणजे एक परीक्षाच असते. या कालावधीत शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. गर्भावस्थेतील महिलांची मानसिक समस्या म्हणजे नोकरी गमावण्याची वाटणारी भीती. याबाबत एक संशाधन करण्यात आले असून यातून ही बाब स्पष झाली आहे. गर्भावस्थेदरम्यान महिलांना नोकरीहून काढून टाकण्याची भीती सतावते हे या संशोधनातून समोर आले आहे.

गर्भवती राहिल्याने नोकरी धोक्यात येऊ शकते. कामावरुन काढले जाऊ शकते, अशी भीती नोकरी करणाऱ्या जास्तीत जास्त महिलांना वाटत असते. याउलट वडील होणाऱ्या पुरुषांना नेहमी नोकरीच्या ठिकाणी प्रोत्साहन मिळते. तर आई होणाऱ्या महिलांना वाटत असते की, आता ऑफिसमध्ये त्यांचे चांगल्याप्रकारे स्वागत केले जाणार नाही. यासंबंधीचे संशोधन एप्लाइड मनोवैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. गर्भावस्थेदरम्यान नोकरीवरुन काढले जाईल, असे ज्या महिलांना वाटते अशा महिलांचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे.

या संशाधनात शास्त्रज्ञांना असे आढळले की, महिलांनी जेव्हा त्यांच्या गर्भवती असण्याचा खुलासा केला तेव्हा त्यांना ऑफिसमध्ये प्रोत्साहन कमी मिळाल्याचे जाणवले. जेव्हा महिलांनी गर्भवती असण्याची माहिती मॅनेजर किंवा सहकाऱ्यांना दिली, तेव्हा त्यांना त्यांच्या कामात प्रोत्साहन मिळण्याचे प्रमाण कमी आढळले. तर पुरुषांना प्रोत्साहन मिळाल्याचे दिसून आले. या संशोधनात असे आढळले की, गर्भवती महिलांना नोकरीवरुन काढण्याची भीती सतावत असते. तसेच महिलांना असे वाटण्याचे कारण म्हणजे गर्भावस्थेदरम्यान खाजगी जीवन आणि करिअरच्या क्षेत्रात अनेक बदल होतात.

या शोधात गर्भवती महिलांसोबत कशाप्रकारे वागावे याबाबत म्हटले आहे की, आई होणाऱ्या महिलांना करिअरसंबंधित प्रोत्साहन कमी दिले जाऊ नये. तसेच मॅनेजरने आई आणि वडील दोघांनाही सामाजिक आणि करिअरशी संबंधित शक्य तेवढी मदत करावी. जेणेकरुन काम आणि कुटुंबाशी संबंधित जबाबदाऱ्या योग्यप्रकारे पार पाडता येतील. भारतात महिलांना या तणावातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा प्रयत्न केला जात आहे. तरी सुद्धा काही असंघटीत क्षेत्रांमध्ये तणाव अजूनही आहे. मात्र सरकारी नोकरी करणाऱ्या महिला या तणावातून बाहेर येत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like