जेजुरीत मर्दानी दसरा उत्सवाची जय्यत तयारी

जेजुरी (संदीप झगडे) : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचा मर्दानी मराठमोळा दसरा उत्सव मंगळवारी (दि. ८) साजरा होणार आहे. त्यानिमीत्त जेजुरी नगरीतील अठरापगड जातीधर्मातील समाजबांधव, ग्रामस्थ, नानकरी, पुजारी, खांदेकरी, सेवेकरी, देवसंस्थान विश्वस्त, अधिकारी, कर्मचाऱ्यांतर्फे खंडेरायाच्या या दसरा उत्सवाची जय्यत तयारी केली आहे.

सुमारे १६ ते १८ तास रंगणाऱ्या या उत्सवाची सांगता बुधवारी दुपारी १२ वाजता होईल. देवसंस्थानच्या वतीने मुख्य मंदिरांसह गडकोट आवार बालद्वारी येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नगरप्रदक्षिणा रमणा मार्ग, देवभेट पालखी कट्टे येथील साफसफाई, दुरुस्ती केली आहे. गडकोट आवारातील बालद्वारीमध्ये घटस्थापनेपासून लोककलावंत यांची हजेरी, घडशी समाजबांधवांकडून त्रिकाल सनईचौघडा वादन सुरू आहे.

मुख्य दसरा उत्सवाच्या दिवशी सालाबादप्रमाणे प्रमुख वतनदार, इनामदार, पेशवे यांचे आदेशानुसार खांदेकरी, ग्रामस्थ, मानकरी यांच्या साथीने मुख्य गडकोट आवारातून तयारी देवभेट सोहळ्यासाठी भंडाऱ्याच्या उधळणीत पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. मध्यरात्रीच्या सुमारास जयाद्री डोंगररांगेच्या कुशीत फटाक्यांच्या आतीषबाजीत दोन्ही पालख्यांचा देवभेट सोहळा रंगणार असून, नगरप्रदक्षिणा उरकून पालखी सोहळा बुधवारी सकाळी गडावर दाखल झाल्यानंतर ऐतिहासिक खंडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

यामध्ये यंदा चित्तथरारक खंडा कसरती होणार असून मोठ्या रकमेची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. देवसंस्थानकडून या वर्षापासून खंडेरायाचे मानकरी ग्रामस्थ यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. लोककलावंतांना मानधन सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

visit : Policenama.com