पंकजा मुंडेंसाठी ‘या’ 2 ‘नवनिर्वाचित’ आमदारांकडून राजीनाम्याची तयारी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परळी विधानसभा मतदार संघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला आहे. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी पुन्हा निवडणूक लढवावी त्यासाठी आपण राजीनामा देऊ अशी तयारी 2 नवनिर्वाचित आमदारांनी दाखवली आहे. पाथर्डी मतदार संघातील भाजपच्या आमदार मोनिका राजळे आणि गंगाखेड मतदार संघातील रासपचे रत्नाकर गुट्टे यांनी पंकजा मुंडेंसाठी आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांची जागा सोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तरी राज्यभरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पंकजा मुंडेंचे पुनर्वसन करण्याची मागणी समर्थकांकडून होऊ लागली आहे. दरम्यान, आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेवुन पंकजा मुंडेंचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. एकंदरीत चित्र पाहता भाजप पक्षश्रेष्ठी पंकजा मुंडेंबाबत नेमका काय निर्णय घेते याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सन 2014 मध्ये पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये धनंजय मुंडे यांचा पराभव केला होता. यावेळी देखील भाजपकडून परळी मतदार संघात जोरदार मार्चेबांधणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहांच्या परळीत सभा आणि रॅली झाली होती. तरीदेखील धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा 30 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. पराभवानंतर पंकजा मुंडे यांना सत्तेत स्थान मिळणार का ? यावरून समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी पंकजा मुंडेंची भेट घेवुन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

Visit : Policenama.com