‘कोरोना’च्या संकट काळात ‘अशी’ करा पैशांची बचत, अनावश्यक खर्च टाळा

पोलिसनामा ऑनलाईन, दि. 20 ऑगस्ट – सध्या कोरोना संकटाचा फटका व्यक्तीसह देशालाही बसत आहे. त्यामुळे या संकट काळात आता आर्थिक व्यवहार कसे करायचे? हे जाणून घेणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळून पैशाची बचत करण्यातच हित आहे, एवढं मात्र नक्की.

कोरोनामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसलाय. लॉकडाऊन, अनलॉक यामुळे अनेक उद्योगधंदे बंद झालेत. त्यामुळे आगामी काळातील अस्थिरता आणि अनिश्चिततेचा विचार करून प्रत्येकाने पैशांची बचत करणे आवश्यक आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्‍यांवर टांगती तलवार असून काहींच्या तर पगारात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कपात केली जात आहे. त्यामुळे आतापासून पैशांचे योग्य नियोजन करणे महत्वाचे आहे.

अनावश्यक खर्च टाळण्यासाठी महिन्याच्या खर्चाचे नियोजन करा. आणि आवश्यक असेल तेवढीच रोख रक्कम जवळ ठेवा. अन्यथा, सर्व पैसे खर्च होण्याची शक्यता अधिक असते. खर्चाचे नियोजन केल्यास महिन्याचा खर्च नियंत्रित राहण्यास मदत होईल. तसेच अनावश्यक खर्चाला देखील चाप बसेल. कोरोना संकटाच्या काळात दीर्घ मुदतीची गुंतवणूक करणे अधिक धोक्याचे आणि कठीण आहे, हे जाणावे.

अशा संकटाच्या काळात कोणत्याही क्षणी पैशांची गरज भासते. त्यामुळे अल्प मुदतीसाठीची गुतंवणूक किंवा म्युच्युअल फंड किंवा अल्प काळाच्या मुदत ठेवीचा पर्याय निवडल्यास लाभ होईल, असे काहीजण सांगत आहेत. तसेच पीपीएफ किंवा पूर्वी केलेल्या दीर्घ मुदतठेवी तशाच ठेवाव्यात. तो पैसा गरजेचेवेळी उपयोगी येतो.

पगार कपात झाल्याने अनेकांना कर्जाचे हप्ते कसे फेडावे?, असा प्रश्न पडलाय. त्यामुळे कर्ज घेताना त्याचा ईएमआय आणि तो फेडताना बचतीवर होणारा परिणाम, याची काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे कर्ज घेताना या बाबींचा विचार अगोदर करावा. आता पगार कपात झाल्यामुळे बँकेशी संपर्क साधून ईएमआयची रक्कम किंवा हप्ता कमी करण्याबाबतच्या योजनांची माहिती घ्यावी. तसेच काही महिने ईएमआय भरण्यास सूट मिळण्याचा पर्याय आहे का?, याबाबतची माहिती घ्यावी किंवा ते अगोदर तपासावे.

सध्या क्रेडिट कार्डचा वापर वाढलाय. मात्र, क्रेडिट कार्डच्या अतिवापरामुळे आर्थिक अडचणीतही भर पडतेय. क्रेडिट कार्डची थकबाकी शिल्लक राहिल्यास त्यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारले जात आहे, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे आपली थकबाकी शिल्लक असल्यास ती लवकर भरण्याकडे अधिक लक्ष द्यावे.

सध्याच्या अस्थिरतेच्या काळात टर्म विमा किंवा आरोग्य विमा काढणे आवश्यक आहे. अनेकदा गुतंवणूक करताना भविष्यातील गरजा लक्षात घेत गुंतवणूक करण्यात येते. मात्र, विम्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे विम्याच्या गुतंवणुकीकडे लक्ष द्यावे. त्यामुळे अस्थिरतेच्या काळात आपल्याला आणि कुटुंबियांना सुरक्षाकवच उपलब्ध होण्यास मदत होईल.

बचतीसाठी अशा मार्गांचा वापर केल्यास त्याचा निश्चित फायदा होईल. तसेच कोरोना संक्रमण संकटाच्या काळातून महत्त्वाचा धडा घेतला पाहिजे. गुतंवणूक करताना आपत्कालीन गरजांसाठी काही रक्कम वेगळी काढावी. त्यामुळे अशा संकटांचा सामना करताना आर्थिक अडचणीं डोंगराएवढ्या वाटणार नाहीत.