एफआरपी वरील व्याज देण्यास राज्यातील काही कारखाने तयार

पुरंदर : (मोहंम्मदगौस आतार) पोलीसनामा ऑनलाईन – साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाल्यापासून १४ दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. राज्यातील ३० कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली असली, तरी ती कायद्यानुसार उशिराच दिली आहे. एफआरपी वरील व्याज देण्याबाबत राज्यातील काही कारखान्यांनी तयारी दर्शविली असल्याची माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

सोमेश्वरनगर ( ता. बारामती ) येथील श्री.सोमेश्वर सह. साखर कारखान्याच्या १० लाख ८१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पुजन शेखर गायकवाड आणि त्यांच्या सुविध्य पत्नी या उभयताच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. कारखान्याच्या वतीने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप , व्हा.चेअरमन धनंजय माळशिकारे , कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक नामदेव शिंगटे, शैलेश रासकर, विशाल गायकवाड, उत्तम धुमाळ, लक्ष्मण गोफणे, ऋतुजा धुमाळ ,हिराबाई वायाळ, कार्यालयीन अधिक्षक सुभाष धुमाळ, फायनान्स मनेजर बाळासाहेब कदम, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड आदी उपस्थित होते.

राज्यात ८० टक्क्यापेक्षा कमी एफआरपी देणारे ८० कारखाने, ५ टक्क्याच्या खाली ३ कारखाने, ३० टक्क्यापेक्षा खाली २४ कारखाने असून राज्यातील एकूण २७ साखर कारखाने अडचणीत आहेत. तर ८० टक्केच्या पुढे एफआरपी देणाऱ्या कारखान्याची संख्या १२५ झाली आहे. गाळप हंगाम चालू असताना आरआरसी काढली तर शेतकर्यांना लवकर पैसे मिळतील. नाहीतर सध्या बाजारात साखरेला ३१०० दर असल्याने उठाव नाही. याकरिता महाराष्ट्रातील सर्व होस्टेल, बचत गट, स्वस्त धान्य दुकानदार, राज्य राखीव पोलिस दल, सर्व आश्रम शाळा, जेल या सर्वांनी साखर थेट साखर कारखान्याकडून खरेदी करावी असे नुकतेच परिपत्रक काढले आहे. तसेच कारखान्यांनी रिटेल साखर विक्रीचे प्रमाण वाढविले पाहिजे.

तसेच काही कारखाने ३१०० रुपयाच्या खाली साखर विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले असून असे कारखाने ताळेबंधात ३१०० रुपये दराने साखर विक्री केल्याचे दाखवून २०० रुपये येणे बाकी असल्याचे दाखवत आहे. त्याचा भुर्दंड काही कारखान्यांना सोसावा लागला आहे. व्याजासह एफआरपी देण्यासाठी काही कारखाने सकारात्मक असून काही कारखाने अनुकूल नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ज्या कारखान्यांनी एफआरपीची संपुर्ण रक्कम अदा केली असेल त्या कारखान्यानाही शेतकर्यांना व्याज द्यावे लागणार असल्याचे शेखर गायकवाड यांनी सांगितले. सर्व क्षेत्रात प्राप्तीकराची कर आकारणी केली जाते त्याप्रमाणेच साखर उधोगालाही प्राप्तीकराची कर आकारणी केली जात असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.