उष्णतेच्या लाटेपासून बचाव आवश्यक ‘ॲक्शन प्लान’ तयार ठेवा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने उष्णतेमुळे प्रभावित राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित राज्यांनी आतापासूनच अंमलबजावणी सुरू करावी, असे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे संयुक्तसचिव डॉ.व्ही.तिरुपुगुज यांनी दिलेत.
नागपूर शहरात प्रथमच राष्ट्रीयस्तरावर एनडीएमएमार्फत वातावरणातील बदल, दिवसेंदिवस उष्णतेचा वाढता प्रकोप, यावर विशेष तज्ज्ञांमार्फत हीट वेव्ह ॲक्शन प्लान तयार करण्यात आला. नागपूर तसेच मध्य भारताला यंदा अधिक तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने तीव्र उष्णतेचा तडाखा ज्या संबंधित राज्यांना बसू शकतो, अशा राज्यांना उष्णतेच्या प्रकोपासून वाचविणे, अधिक तीव्र उष्णतेच्या नवीन ठिकाणांचा शोध घेणे तसेच सामान्य नागरिकांना यापासून सुरक्षित ठेवण्याकरिता यावेळी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
मानव तसेच जनावरांचे उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू थांबविणे हा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या हीट ॲक्शन प्लानचा मूळ उद्देश आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यशाळेमुळे राज्य शासनाला उष्णता प्रतिबंधक आराखडा आणि उपाययोजना राबविण्यासाठी साहाय्यभूत ठरेल. सन २००५ मध्ये देशात उष्णतेच्या प्रकोपामुळे १५ राज्ये प्रभावित झाली होती. परंतु, वाढत्या तापमानामुळे सन २०१८ मध्ये हा आकडा वाढत जाऊन प्रभावित झालेल्या राज्यांची संख्या १९ एवढी झाली.