‘प्रेसेंट टीचर…! ‘ आता दिवसातून तीन वेळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी आता दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्याच्या सुचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. यात राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश असणार आहे. विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलल्याचे शिक्षण विभागाने उचलले आहे. सुरक्षेचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी शाळा सुटण्यापूर्वी अशी दिवसातून तीन वेळा हजेरीची नोंद करणे सर्व शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत देशभरातच शाळेच्या आवारातून मुलांचे अपहरण करणे, लैंगिक अत्याचार करणे, असे गंभीर प्रकार घडले आहेत. त्यामुळे पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळांमधील मुलांच्या सुरक्षेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेऊन शाळेतील मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्यासंदर्भात सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आता राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुलांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना करण्याच्या व त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाने शनिवार, २ जूनला तसे परिपत्रक काढले आहे.

बालकांविरुद्ध होणाऱ्या लैंगिक गुन्ह्य़ांबाबत माहिती असणाऱ्या व्यक्तीने तत्काळ विशेष किशोर पोलीस पथक किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरक्षेचा भाग म्हणून सर्व शाळांमध्ये तक्रार पेटीची व्यवस्था करायची आहे. शाळेच्या आवारात, तसेच प्रवेशद्वारावर पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये शिक्षक व कर्मचारी नेमताना त्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पोलिसांकडून घ्यावे, असे व्यवस्थापनांना सांगण्यात आले आहे.

खासगी वाहनाने मुलांना शाळेत सोडायला येणाऱ्या वाहनचालकाची संपूर्ण माहिती पालकांनी आपल्याजवळ ठेवायची आहे, तसेच त्याची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे. शाळेच्या बसने मुलांना त्यांच्या घराजवळच सोडले पाहिजे. बसमध्ये शेवटची मुलगी असेपर्यंत महिला सेविका किंवा शिक्षिका सोबत असणे बंधनकारक राहणार आहे. मुलींना शालेय उपक्रम किंवा स्पर्धेसाठी बाहेर पाठविताना सोबत महिला सेविका किंवा शिक्षिका असणे अनिवार्य राहणार आहे. विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक इजा पोहोचेल, अशी कोणत्याही प्रकारची शिक्षा करू नये, असे सर्व शाळांना बजावण्यात आले आहे.

शाळांवर जबाबदारी वाढली
शाळेच्या परिसरात असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची राहणार आहे.
शाळेच्या आवारात कोणतीही अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही, त्याची खबरदारी व्यवस्थापनांनी घ्यायची आहे.
शाळेतील मुलांच्या उपस्थितीसंदर्भात सकाळी शाळा सुरू होताना, तसेच दुपारी आणि संध्याकाळी हजेरी घ्यायची आहे व त्याची नोंद करायची आहे. तसेच सर्वाधिक महत्वाचे म्हणजे , गैरहजर आढळणाऱ्या मुलांची माहिती त्यांच्या पालकांना मोबाइलवरून लघुसंदेशाद्वारे कळवायची आहे.