Lockdown काळात केमिस्ट दुकानांमध्ये मिळणार नाहीत कॉस्मेटिक वस्तू : CAPD चा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना केमिस्ट दुकानांमध्ये कॉस्मेटिक वस्तू उपलब्ध करून देऊ नये अशी सूचना केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट (सीएपीडी) ने सर्व केमिस्ट दुकानदारांना दिल्या आहेत.

लॉकडाऊन असून देखील कोणतेही महत्वाचे काम नसताना बरेचजण डॉक्टरांची जुनी प्रिस्क्रिप्शन घेऊन घराबाहेर पडत आहेत. तसेच औषधांच्या दुकानात जाऊन औषधांऐवजी कॉस्मेटिक वस्तूचीं खरेदी करत आहेत. त्यामुळे दुकानांमध्ये गर्दी होते. असे प्रकार यापूर्वीच्या लॉकडाऊन मध्ये देखील पहावयास मिळाले. या प्रकारांची केमिस्ट असोसिएशन ने गांभीर्याने दखल घेतली आहे.

याविषयी सीएपीडीचे अनिल बेलवरकर यांनी सांगितले की, अनेकदा बाहेरील परिस्थितीचा अंदाजा घेण्सासाठीही बरेचजण बाहेर पडतात. त्यामुळे रस्त्यांवर, दुकानांमध्ये गर्दी होते. मागील लॉकडाऊनमध्ये हा अनुभव घेतल्यावर आता केमिस्ट दुकानांमध्ये लॉकडाऊनच्या काळात कॉस्मेटिक वस्तू उपलब्ध करून देऊ नका अशा सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.

घरपोच औषधे देण्याची व्यवस्था

बेलवरकर यांनी सांगितले की, नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात औषधे उपलब्ध होण्यासाठी त्यांनी त्यांच्या केमिस्टच्या वॉट्स अप क्रमांकावर प्रिस्क्रिप्शन पाठवल्यास त्यावरून त्यांना घरपोच औषधे देण्याची व्यवस्था करण्यात येईल. केवळ औषधांसाठी नागरिकांनी घराबाहेर पडून गर्दी करू नये असे आवाहन संघटनेने केले आहे.