निवडणुकीच्या निकालानंतर बंगालमध्ये हिंसा, पीडितांना भेटण्यासाठी आज जेपी नड्डा बंगालमध्ये; 5 मे रोजी भाजपाचे देशव्यापी आंदोलन

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपाचा आक्रमकपणा थांबलेला नाही. निवडणूक निकालानंतर झालेली हिंसा पाहता भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसांच्या बंगला दौर्‍यावर जाणार आहेत. नड्डा यांचा हा दौरा आजपासून सुरू होईल आणि या दोन दिवसीय दौर्‍यावर भाजपा अध्यक्ष हिंसेत पीडित भाजपा कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तसेच बंगालमध्ये टीएमसी कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसेच्या विरूद्ध भाजपा 5 मे रोजी देशभरात आंदोलन करणार आहे.

पार्टीने म्हटले की, आंदोलनात कोविड प्रोटोकॉलचे पालन केले जाईल. आंदोलनात भाजपाच्या सर्व मंडल संघटना सहभागी होतील. निवडणूक निकाल लागल्यानंतर एक दिवसांनतर बंगलामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा दिसून आली, ज्यामध्ये कथित प्रकारे मारहाण आणि दुकानांची लुटमार झाली, यात अनेक भाजपा कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्याच्या घटनेचा अहवाल मागवला आहे.

Advt.

भाजपाने एका पार्टी कार्यालयाला लावलेल्या आगीचा व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यमाध्ये कार्यालय जळताना दिसत आहे. लोक घाबरून पळताना दिसत आहेत. सोशल मीडियावर मृत व्यक्तींची छायाचित्र आणि एका दुकानातून लूट करून पळताना लोक दिसत आहेत. भाजपाचा दावा आहे की त्यांच्या किमान सहा कार्यकर्त्यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये एका महिलेचा सुद्धा समावेश आहे. भाजपा याचा आरोप तृणमूलवर लावत आहे.

भाजपाने नंदीग्राममधील पक्षाच्या तोडफोडीचा व्हिडिओ शेयर केला आहे. तसेच अनेक दुकानांच्या लुटमारीचे व्हिडिओसुद्धा समोर आले आहेत. दरम्यान, राज्यपालांनी याबाबत अधिकार्‍यांना कायदा सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले आहेत.