राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली कोरोना लस, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   नुकताच 1 मार्च पासून कोरोना व्हायरसच्या लसीकरणाचा दूसरा टप्पा देशभरात सुरू झाला आहे. त्याअंतर्गत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. राष्ट्रपती आपल्या मुलीसमवेत दिल्लीतील लष्करी आर अँड आर हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि कोरोनाची लस घेतली. त्यानंतर देशात लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल त्यांनी डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही या टप्प्यात पात्र असलेल्या सर्वांना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले.

दुसर्‍या टप्प्यातील लसीकरण मोहिमेअंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील गंभीर आजारांना लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी, लोक को-विन 2.0 पोर्टल किंवा आरोग्य सेतु या अ‍ॅपवर स्वतःची नोंदणी करू शकतात. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी कोवॅक्सीन या स्वदेशी लसीचा पहिला डोस घेतला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, 2 मार्च रोजी रात्रीपर्यंत कोविड -19 लसीचे 1.54 कोटी डोस देशभरातील लोकांना देण्यात आले आहेत. या आकडेवारीमध्ये मंगळवारी दिलेले 6,09,845 डोस देखील आहेत. कोविड -19 ची देशव्यापी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणापासून सुरू झाली. मंत्रालयाने म्हटले की, मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार आतापर्यंत लसच्या एकूण 1,54,61,864 डोस देण्यात आले आहेत. यात 60 वर्षांहून अधिक वयाचे 4,34,981लाभार्थी आणि गंभीर आजार असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 60,020 लाभार्थ्यांचा समावेश आहे.