‘शिवसेनेमुळंच राणे मोठे झाले अन् शिवसेनेमुळंच रस्त्यावर आले’

जळगाव : पोलिसनामा ऑनलाइन – नारायण राणे यांचं शिवसेनेशी जुनं आणि प्रेमाचं नातं आहे. ते शिवसेनेमुळे मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावरही आले. असा चिमटा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना जळगावात काढला.

भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील सरकार कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यास अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.

त्यावरती मंगळवारी गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीमध्ये राणेंचा समाचार घेतला. ‘कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सर्वानी राज्य सरकारला साथ देण्याची गरज आहे. उपाययोजनांमध्ये कुठे त्रुटी राहिल्या असतील तर विरोधकांनी त्या सरकारच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. मात्र, असं न करता राज्यपालांकडे जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणं योग्य नसल्याचं, मत त्यांनी व्यक्त केलं.

तसेच कोरोना हा काही महाराष्ट्रानं आणलेला नाही. देशात सगळीकडे त्याचा प्रसार झाला आहे. ही आपत्ती आहे, त्याला सामोरं गेलं पाहिजे. अशा स्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर महाराष्ट्रासोबत गुजरात, उत्तरप्रदेश, आणि दिल्लीतही ती लागू करावी लागेल. कोरोनाच्या आपत्तीला राजकीय राजकारणाचा रंग न देता समाजसेवेच्या माध्यमातून, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या आपत्तीवर कशी मत करता येईल? यावरती राणेंनी सूचना द्याव्यात. तसेच शिवसेनेशी राणे यांचे जुने नातं आहे, सेनेमुळेच ते मोठे झाले अन सेनेमुळेच ते रस्त्यावर आले, असा चिमटा पाटील यांनी यावेळी काढला.