सन 1980, 2014 नंतर आज महाराष्ट्रावर ‘नामुष्की’ ! राज्यात ‘या’ क्षणापासुन ‘राष्ट्रपती राजवट’ लागू

नवी दिल्ली : पोलीसनामा आनलाइन – राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांपैकी कोणीही सत्तास्थापनेचा दावा न केल्यानं अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस केली होती. त्यास आता मंजुरी देण्यात आली असून या क्षणापासुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सत्तास्थापनेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अयशस्वी ठरल्यानं ही नामुष्की महाराष्ट्रावर ओढावली आहे.

विधानसभेचा दि. 24 ऑक्टोबर रोजी निकाल लागला. सर्वात मोठा पक्ष म्हणून 105 जागा जिंकत भाजपनं स्थान मिळवलं तर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर अनुक्रमे शिवसेना-56 आणि राष्ट्रवादी काँग्रेस – 54 राहिलं. राज्यपालांकडून सर्वप्रथम भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आलं. त्यांना 3 दिवसांचा कालावधी देण्यात आला. मुख्यमंत्री पदावर अडुन बसलेल्या शिवसेनेशी काडमोड झाल्यानं भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा करू शकत नाही म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सांगितलं. त्यानंतर काही वेळातच राज्यपालांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आणि 24 तासांचा वेळ दिला. शिवसेना देखील बहुमता अभावी सत्तास्थापनेचा दावा करू शकलं नाही. त्यानंतर राज्यपालांनी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आणि 24 तासाचा वेळ दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये 24 तासामध्ये वाटाघाटी झाल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस देखील सत्ता स्थापनेचा दावा करू शकलं नाही. त्यानंतर मात्र राज्यपालांनी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस केली. केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली आणि त्यांनी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. अखेर आज (मंगळवारी) रात्री राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली आहे. त्यामुळे या क्षणापासुन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

यापुर्वी 2 वेळा महाराष्ट्रात लागू झाली होती राष्ट्रपती राजवट
इतिहासात महाराष्ट्रात 2 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. सन 1978 आणि सन 2014 मध्ये राज्य राष्ट्रपती राजवटीखाली गेलं होतं. शरद पवार यांच्या अधिपत्याखाली सन 1978 मध्ये पुलोदचं सरकार होतं. ते सरकार बरखास्त करून त्यावेळी विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे दि. 17 फेब्रुवारी ते दि. 9 जून 1980 दरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सन 2014 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. सन 2014 मध्ये 32 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचा पाठिंबा राष्ट्रवादीनं काढल्याने सरकार कोसळलं होतं आणि त्यानंतर दि. 28 सप्टेंबर 2014 ते दि. 31 ऑक्टोबर 2014 दरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

राष्ट्रपती राजवट काय असते –

भारतीय राज्यघटनेत 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत –

1. राष्ट्रपती आणीबाणी

2. आर्थिक आणीबाणी

3. राष्ट्रपती राजवट

कलम 356 नुसार राज्यातील प्रशासन सुव्यवस्थेत नसल्यास राष्ट्रपती राजवटीची तरतूद आहे. ज्या राज्यातील सरकार केंद्राच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत आहेत तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घेतला जातो, राज्यपाल राष्ट्रपतींकडे राज्यातील परिस्थितीचा अहवाल देतात त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवटीची घोषणा करण्यात येते.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्याला संसदेची मान्यता आवश्यक असते. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर 6 महिने राष्ट्रपती राजवट लागू करता येते. परंतू संसदेने पुन्हा एकदा 6 महिन्यापर्यंत मान्यता दिल्यास हा कालावधी वाढू शकतो. राष्ट्रपती राजवट पुढील 3 वर्षांपर्यंत कायम करता येते.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास काय होईल –
एकदा का राष्ट्रपती राजवट लागू झाली तर राज्याचा सर्व कारभार राष्ट्रपतीच्या हाती जातो. त्यांच्यामार्फत राज्यपाल राज्याचा कारभार पाहतात. राज्याच्या मुख्य सचिवांना हाताशी घेऊन राज्यपाल राज्याचा कारभार पाहत असतात.

राज्यविधीमंडळाची कामे देखील संसदेकडे सोपवण्यात येतात. राष्ट्रपती कोणत्याही अधिकाऱ्यांकडून कामे करु घेऊ शकतात. त्यानंतर राज्याच्या निधीतून पैसे खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपतीकडून देण्यात येतात. यासाठी राष्ट्रपती प्रासंगिक व्यवस्था करुन घोषणांची पुर्तता करतात.

आगामी 3-4 दिवसात काय
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र येवुन चर्चा करण्यास सुरवात करतील. त्यांच्यात सत्तास्थापनेबाबत एकमत झाल्यास आणि सत्तेच्या वाटाघाडी झाल्यास शिवसेना राज्यपालांना भेटुन सत्तास्थापनेचा दावा करू शकते.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like