भाजपला आणखी एक धक्का ? शिरोमणी अकाली दलानंतर ‘जेजेपी’वर साथ सोडण्याचा दबाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कृषी विधेयकावरुन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असणाऱ्या एनडीएमध्ये बंडखोरी होत असल्याचे पहायला मिळत आहे. कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांची ही नाराजी पाहता भाजपचा जुना पक्ष शिरोमणी अकाली दलाने केंद्र सरकारशी संबंध तोडला आहे. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे.

शिरोमणी अकाली दल केंद्रातून बाहेर पडल्यानंतर आता हरियाणामध्ये भाजपचा सहकारी पक्ष जननायक जनता पार्टी (जेजेपी) वर दबाव वाढत चालला आहे. शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे जेजेपीचे प्रमुख उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला सध्या चांगलेच गोंधळात अडकले आहेत. हरियाणामध्ये भाजप-जेजपी युतीचे सरकार आहे. हरियाणाचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी पंचायती करत या विधेयकाला विरोध करत आहेत. शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे.

शेतकऱ्यांची नाराजी पाहून जेजेपीच्या आमदारांमध्ये बंडखोरीची ठिणगी पडली आहे. जेजेपीचे आमदार रामकुमार गौतम यांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात वक्तव्य करत होते. आता टोहानाचे आमदार देवेंद्रसिंग बबली यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात दुष्यंत चौटाला यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे.

हरियाणात जेजीप- भाजप युती सरकार

हरियाणामध्ये मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्त्वात सरकार जेजेपीच्या पाठिंब्याने स्थापन केले आहे. चौधरी देवीलाल हे शेतकरी नेते म्हणून देशात ओळखले जातात. जेजेपीचा राजकीय आधार ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांची नाराजी आणि राजकीय नुकसान पाहता जेजेपीने लाठीचार्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. दुष्यंत चौटाला यांचे लहान भाऊ दिग्विजय चौटाला म्हणाले, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याबद्दल जेजेपी माफी मागते. जेजेपी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्याचे हित पक्षाचं प्राधान्य असल्याचे त्यांनी म्हटले होते.

जेजेपीचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे कृषी विधेयकाच्या समर्थनात आहेत तर काँग्रेस शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर झाले आहे. मात्र, जेजेपीची याच मुद्यावर कोंडी झाली असून पक्षाच्या आमदारांची बंडाची भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीमध्ये दुष्यंत चौटाला आपले पद सोडतील का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.