Satara News : दुसर्‍यांना गोत्यात आणण्यासाठी सख्ख्या बहिणीला जाळलं, फिर्याद देणारेच निघाले खुनी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक वर्षापासून सुरु असलेल्या जमिनीच्या वादातून सख्ख्या बहिणीचा खून करुन विरोधकांना अडकविण्यासाठी बहिणीचा मृतदेह जाळला. याप्रकरणचा तपास करत असताना भावानेच पत्नीच्या मदतीने बहिणीचा खून केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे 10 फेब्रुवारी (बुधवार) रोजी महुली उर्फ मौली झबझब पवार (वय-60) या महिलेचा खून झाला होता. या महिलेचा खून जमिनीच्या वादातून करण्यात आला असल्याची तक्रार महुली पवार यांची भावजय कल्पना पवार (वय-45) हिने फलटण पोलिस ठाण्यात दिली. यावरुन पोलिसांनी तपास करुन सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांची पोलिस कोठडीत चौकशी केली. चौकशी दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांनी खून केला नसल्याचे उघड झाल्याने पोलिसांना फिर्यादी यांच्यावर संशय आला.

विरोधकांना जेलमध्ये पाठवण्यासाठी केला खून

या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या एका पथक तीन दिवस गावात तपास करत होते. तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. मयत महुली पवार ही भाऊ अशोक पवार याच्याकडे राहात होती. महुली हिचे वय झाल्याने आणि तिचा काही उपयोग नसल्याने तिचा खून करून जमिनीचा वाद सुरु असलेल्या विरोधकांना अडकवण्याचा कट भाऊ आणि त्याच्या पत्नीने रचला. 10 फेब्रुवारीला भाऊ अशोक आणि त्याची पत्नी कल्पना यांनी महुली यांना रानातील झोपडीत नेले.

चित्रपटाला शोभेल असा बनाव

सायंकाळी अशोक आणि कल्पना यांनी महुली हिचा डोक्यात दगड घालून खून केला. खून केल्यानंतर पुरवा नष्ट करण्यासाठी झोपडीवर पेट्रोल टाकून झोपडी पेटवून दिली. इतकेच नाही तर कुटुंबातील मुलांसह त्यांनी स्वत:च्या शरिरावर ओरखडे ओढले. जेणेकरुन विरोधकांनी त्यांना देखील मारहाण केल्याचे सिद्ध होईल. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा कट आरोपींनी रचला होता. मात्र विरोधकांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नात तेच आडकले.

पोलिसांकडून आरोपींना अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करुन कल्पना अशोक पवार, अशोक झबझब पवार, कमांडो उर्फ किमाम अशोक पवार, गोप अशोक पवार, विशाल अशोक पवार, रोशनी रासोट्या काळे, काजल उर्फ नेकनूर पोपट पवार, मातोश्री ज्ञानेश्वर पवार (सर्व रा. अलगुडेवाडी, ता. फलटण) यांना अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहाय्यक पोलिस फौजदार उत्तम दबडे, ज्योतीराम बर्गे, तानाजी माने, पोलीस हवालदार संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, प्रवीण फडतरे, रवि वाघमारे, निलेश काटकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, विक्रम पिसाळ, वैभव सावंत, मोहसिन मोमीन, पंकज बेसके, गणेश कचरे यांच्या पथकाने केली.