पाथरीत बालविवाह रोखला, अधिकाऱ्यांनी दाखवली समयसूचकता; मुला-मुलीच्या नातेवाईक, भटजी, फोटोग्राफर, केटरर्ससह 11 जणांवर FIR

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे आज (गुरुवार) एक बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्ष आणि पोलिसांना यश आले आहे. पाथरी येथे हा बालविवाह आयोजित करण्यात आला होता. यासंदर्भात माहिती मिळताच परभणी चाईल्ड लाईफ लाईनच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि महिला बाल विकास कार्यालयाला याची माहिती दिली. कक्षाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पाथरी पोलिसांनी आदर्श नगर भागात सुरु असलेला बालविवाह रोखून मुला-मुलीच्या नातेवाईकांसह भटजी, फोटोग्राफर, केटर्सवर गुन्हा दाखल केला आहे.

पाथरी शहरातील आदर्श नगर भागात एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती परभणी चाईल्ड लाईफ लाईनचे केंद्र समन्वयक संदीप बेडसुरे यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि महिला बाल विकास कार्यालय यांना दिली. कक्षातील अधिकारी आम्रपाली पाचपुंजे यांनी सकाळी पाथरी पोलिस ठाण्यात धाव घेत पोलीस उपनिरक्षक मनोज आहिरे यांना माहिती दिली. पोलिसांनी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास बालविवाह रोखला.

पोलिसांना बाल विवाह होणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आदर्श नगर येथील विवाहस्थळी धाव घेतली. पाथरी येथील 17 वर्षाच्या मुलीचे वडवणी तालुक्यातील एका मुलासोबत विवाह सुरु होता. वधू अल्पवयीन असल्याने विवाह तातडीने रोखण्यात आला. पोलिसांनी मुलगा आणि मुलीच्या नातेवाईकांसह भटजी, फोटोग्राफर, केटरर्स अशा 11 जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी कृष्णा कांबळे, कांताबाई तिखे, राधाकिशन तिखे, निकिता कांबळे, अशोक शितळकर, मुक्ताबाई कांबळे, रामेश्वर कांबळे, गणेश मस्के, शामराव शंकरराव जोशी (भटजी) राहुल पारखे, अशोक घोलम (रा. चिंचवडगाव ता. वडवणी) यांचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.