पुण्यातील ३ गुंड २ वर्षांसाठी तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील परिमंडळ ५ मधील ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ सराईत गुंडांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिले आहेत.
सचिन उर्फ घारे अण्णा सोंडकर (वय. ३०, अप्पर इंदिरा नगर बिबवेवाडी), प्रशांत उर्फ परश्या अनिल पवार (वय. २७, मुंढवा), ऋषिकेश उर्फ चिंट्या महेंद्र कांबळे (वय २३, रा. फुरसुंगी) अशी तडीपार करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

मागील काही महिन्यांच्या कालावधीत पुणे शहरात घडलेल्या घातक हत्यारांचा वापर करून घडलेले गंभीर गुन्हे व त्यातील सराईत गुन्हेगार यांचा सहभाग याचा विचार करत तिघांना तडीपार करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूकीच्या काळात शहरात व परिमंडळ ५ च्या हद्दीत असलेल्या हडपसर, मुंढवा, वानवडी, कोंढवा, मार्केटयार्ड, बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी एकाच वेळी तिघांनाही पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आय़ुक्तालय व जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

तडीपार केलेल्या कालावधीत तिघांपैकी कोणीही शहरात दिसून आल्यास त्याबाबत नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.