प्रेमभंगामुळे तरुणीची आत्महत्त्या ; प्रियकरासह नव्या प्रेयसीविरुध्द गुन्हा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेमभंग झालेल्या तरुणीने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा प्रियकर आणि त्याची नवी प्रेयसीविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकर आणि प्रेयसी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना जुने नाशिक भागातील कोळीवाडा परिसरात घडली होती.

प्रिया उर्फ प्रियंका राजू पवार (वय-१८) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकर उमेश शिवाजी पिंगळे (रा. कोळीवाडा) आणि त्याची नवी प्रेयसी साक्षी पगारे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंकाचे वडील राजू दत्तू पवार (वय-४३) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने नाशिकमधील कोळीवाडा येथे राहणाऱ्या प्रिया पवार आणि उमेश पिंगळे यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्यांचा प्रेमभंग झाल्याने प्रियंकाला नैराश्य आले. यातूनच तिने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्यांना प्रियंकाची डायरी सापडली. यामध्ये तिने प्रेमभंगाचे कारण लिहून ठेवले होते. पोलिसांना मिळालेल्या डायरीवरुन तपास सुरु केला. दरम्यान, राजू पवार यांनी पोलिसांकडे फिर्य़ाद दिली. उमेश याने प्रियंकाला प्रेमाचे आमीष दाखवून तिची फसवणूक केली. त्यानंतर उमेशने त्याची नवी प्रेयसी साक्षी पगारे यांनी आपआपसांत संगनमत करुन प्रियंकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्य़ात राजू पवार यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादेत म्हटले आहे. पोलिसांनी उमेश आणि साक्षी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, प्रियंकाच्या आत्महत्येनंतर दोघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.