‘कोरोना’च्या रुग्णवाढीचा गैरफायदा घेत ऑक्सिजन पुरवठादारांकडून दरवाढ

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात ऑक्सिजन सिलेंडरची विक्री महागली असताना आता ऑक्सिजन मशीनच्या भाड्यातही तिप्पटीने वाढ झाली आहे. ऑक्सिजन मशीन आणि सिलेंडरची विक्री तसेच या वस्तू भाड्याने देणार्‍या व्यवसायिकांनी ऑक्सिजन मशीनच्या किंमती तब्बल 25 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

निगेटिव्ह होऊन गेलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच ऑक्सिजन घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अनेकजण ऑक्सिजन सिलेंडर किंवा ऑक्सिजन मशीन विकत घेत आहेत. याचाच गैरफायदा उठवण्याचे काम व्यावसायिकांकडून केले जात आहे. कोरोनापूर्वी चिनी कंपन्यांच्या मशीनचे दर 27 ते 35 हजार होते आता ते दर 38 ते 45 हजारांपर्यत गेले आहेत. तर ब्रँडेड कंपन्यांचे दर 47 हजार ते 1 लोकांपर्यत होते ते आता 70 हजार ते सव्वा लाखांपर्यत पोहचले आहेत. त्यामुळे रुग्णांची ही लूट थांबवण्यासाठी ऑल फूड अँड ड्रग्ज असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.