स्टील उद्योगाने घेतली भरारी; 12 वर्षांनंतर 50 हजारांवर पोहोचले दर

जालना : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनलॉक नंतर अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. अनेक उद्योग पुन्हा स्थिर झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी बांधकाम क्षेत्रात प्रगतीकारक भरारी घेतली. त्याच परिणाम स्टील उद्योगावर झाला आहे. २००८ नंतर प्रथमच स्टीलचे प्रतिटन दर हे सर्व करांसहित ५० हजार रुपयांवर पोहोचले आहेत. कच्चा मालही पाहिजे त्याप्रमाणात उपलब्ध होत नसल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले.

स्टील उद्योगात देशात जालन्याने मोठी आघाडी घेतली आहे. जवळपास १४ मोठे स्टील उद्योग आणि २२ लहान उद्योग आहेत. १४ स्टील उद्योजक हे कच्च्या आणि पक्क्या मालाचे उत्पादन करतात. तर २२ लहान उद्योग म्हणजेच रिरोलिंग मिलमधून वेगवेगळ्या आकाराच्या लोखंडी सळयांची निर्मिती होते. दररोज हजारो टन स्टीलचे उत्पादन येथे केले जाते. अंदाजित १५ हजार कोटींची गुंतवणूक या एकट्या उद्योगात आहे.

तब्ब्ल १२ वर्षांनंतर वाढ
दरवाढीबाबत स्टील मॅन्युफॅक्चर असाेसिएशनचे प्रदेश अध्यक्ष योगेश मानधनी म्हणाले की,
घरबांधणीसाठी प्रामुख्याने ६ एम.एम.चे दर हे ४७ हजार ७०० अधिक १८ टक्के जीएसटी, ८ एम.एम. ४५ हजार अधिक जीएसटी, आणि १२ एम.एम.४४ हजार अधिक १८ टक्के जीएसटी प्रतिटन असे आहेत. तब्बल १२ वर्षांनंतर ही भाववाढ झाली असल्याचे ते म्हणाले.