ऐन उन्हाळयात खिशाला कात्री ; AC , Fridge होणार महाग 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . आशा परिस्थितीत उन्हाळयापासून थंडावा मिळण्यासाठी एसी , रेफ्रिजरेटर अशा वस्तू खरेदी करण्याकडे सर्वसामान्य नागरीकांचा ओढा असतो . मात्र आता तुम्ही एसी, रेफ्रिजरेटर खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे . याचे कारण म्हणजे सरकार एसी , रेफ्रिजरेटर , वॉशिंग मशीन आणि माइक्रोवेव ओवन अशा वस्तूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहे.

आयात शुल्क वाढवल्यामुळे एसी , रेफ्रिजरेटर , वॉशिंग मशीन महाग होऊ शकतात . मागील वर्षी सरकारने १९ उत्पादनाच्या आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली होती . याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार , वाणिज्य मंत्रालय एसी आणि  रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसर आणि कंडेन्सर बनवण्यासाठी लागणाऱ्या स्टील शीट आणि कॉपर शीट वर सीमा शुल्क वाढवण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहे .  सरकारने मागील वर्षी कॉम्प्रेसर वरील आयात शुल्क ७.५ टक्के वरून १० टक्के करण्यात आला होता .  तसेच एसी , रेफ्रिजरेटर आणि १० किलोपेक्षा कमी क्षमता असलेल्या वॉशिंग मशिनवरील आयात शुल्क २० टक्के करण्यात आला होता .

सरकारकडून आयात शुल्क जर वाढवण्यात आला , तर याचा फटका मॅन्युफॅक्चरर्सना बसू शकतो . मागील वर्षी सरकारने आयात शुल्क वाढवल्यानंतर मॅन्युफॅक्चरर्सनी उत्पादनांच्या किमतींमध्ये ३-५ टक्के वाढ केली होती . त्यामुळे आता ऐन उन्हाळ्यात एसी आणि रेफ्रिजरेटरच्या किंमती वाढल्या तर सामान्य नागरिकांच्या डोकेदुखीत वाढ होऊ शकते .