‘कोरोना’ला नष्ट करण्यासाठी पुजार्‍यानं दिला ‘नरबळी’, शीर कापून केलं ‘अर्पण’

कटक : पोलीसनामा ऑनलाइन  – ओडिसाच्या कटक जिल्ह्यात एका पुजार्‍याने मंदिरात नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुजार्‍याला विश्वास होता की, यामुळे घातक कोरोना व्हायरस नष्ट होईल. त्याने सांगितले की, देवाने स्वप्नात येऊन मला सांगितले की नरबळीने कोरोनाचा कहर नष्ट होईल.

कटक जिल्ह्यातील बंधहुडा गावात बुधवारी रात्री अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली. येथे माता ब्राह्मणी देवी मंदिर परिसरात पुजार्‍याने एका व्यक्तीचा बळी दिला. मंदिर परिसराच्या आत या व्यक्तीचा मृतदेह मिळाला. मृत व्यक्तीचे नाव सरोज कुमार प्रधान (52) आहे.

स्थानिक पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले धारधार हत्यार जप्त केले आणि पुजारी संसार ओझाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. पुजार्‍याने कोरोना व्हायरसचा प्रकोप थांबण्यासाठी एका माणसाला ठार मारल्याची कबुली दिली. पुजार्‍याने सांगितले की, स्वप्नात येऊन देवानेच त्याला हे काम करण्याचा आदेश दिला होता.

पोलिसांनी आरोपी पुजार्‍याला अटक केली असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी खुनाचा दाखल गुन्हा दाखल करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला.

याबाबत डीआयजी आशीष सिंह यांनी सांगितले की, ही एक भयंकर घटना आहे. आम्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून तपास सुरू आहे.