शीतल आमटेंचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला समोर, ‘या’मुळे झाला मृत्यू

वरोरा/चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कुष्ठरुग्णांच्या आयुष्यात जगण्याची उमेद पेरणाऱ्या वरोरा येथील आनंदवनात दिवंगत बाबा आमटे यांची नात डॉ. शितल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली. डॉ. शीतल आमटे यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये डॉ. शीतल आमटे यांचा श्वास रोखल्याने मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली असून त्याला आज एक महिना पूर्ण झाला आहे.

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी गेल्या 30 नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच संपूर्ण आनंदवन आणि कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली होती. त्यांच्या खोलीत इंजेक्शन आणि विषारी औषध आढळून आले होते. त्यांनी आपल्या उजव्या हाताला इंजेक्शन टोचले होते. चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन झाले. त्याचा प्राथमिक अहवाल अलीकडेच मिळाला. मात्र, त्यावर पोलिस प्रशासनाने बोलणे टाळले होते.

आता डॉ. शीतल यांचा मृत्यू श्वास रोखल्याने झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. नागपूर येथील न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेतील अंतिम शवविच्छेदनाचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. न्यायवैद्यकीय अहवाल आणि इतर अहवाल अजून आले नाही. ते आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, असे वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांनी सांगितले.