जगभर फिरून भीक मागत आहेत पंतप्रधान इम्रान खान, पाकिस्तानच्याच मंत्र्याची मुक्ताफळे 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारताच्या शेजारील देश पाकिस्तान अतिशय वाईट आर्थिक संकटातून जात आहे. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान विविध देशांचे दौरे करीत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून “पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जगभर फिरून भीक मागत आहेत. असे विधान पाकिस्तानच्याच सिंध प्रांतातील मुख्यमंत्र्याने केले आहे. सिंधचे सीएम मुराद अली शाह यांनी ही टीका केली.
 इम्रान खान यांना सरकारमधला अनुभव नाहीच 
शाह पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आसिफ अली झरदारी यांचा पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी अर्थातच पीपीपीचे नेते आहेत. ते म्हणाले, “इम्रान खान देश-देश फिरून प्रत्येक नेत्याकेड हात पसरवून भीक मागत आहेत.”समा टीव्हीच्या वृत्तानुसार, मटली येथील सभेला संबोधित करताना रविवारी शाह यांनी हे वक्तव्य केले आहे. सोबतच, इम्रान खान यांनी आपल्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुभव नसलेल्यांना जागा दिली असे म्हटले आहे.
पाकिस्तानला ४३० अब्ज रुपयांचे बेलआऊट पॅकेज 
उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या आठवड्यात संयुक्त अरब अमिरातने पाकिस्तानसाठी ६.२ अब्ज अमेरिकन डॉलरचा (४३० अब्ज भारतीय रुपये) बेलआऊट पॅकेज जाहीर केला आहे. पाकिस्तानी दैनिक डॉनच्या वृत्तानुसार, यूएईचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान रविवारी पाकिस्तानात आले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी इम्रान खान यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यामध्ये, बेलआऊट पॅकेजचा वापर कसा होणार यावरही चर्चा झाली.

या पॅकेजमध्ये ३.२ अब्ज अमेरिकन डॉलरचा इंधन पुरवठा केला जाणआर आहे. तर ३ अब्ज अमेरिकन डॉलर रोख दिले जात आहेत. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात सौदी अरेबिया सरकारने सुद्धा पाकिस्तानला जवळपास इतकाच बेलआऊट पॅकेज जाहीर केला आहे. यानंतर पाकिस्तानने आपले लक्ष कतारवर केंद्रीत केले आहे. त्यांच्याकडून सुद्धा पाकला मोठे पॅकेज मिळण्याची शक्यता आहे.