पंतप्रधान मोदींना स्क्रिप्टची गरज नसते : केंद्रीय मंत्र्यांचा मनमोहन सिंग यांना टोला

दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ‘मी असा पंतप्रधान नव्हतो जो माध्यमांशी बोलण्यासाठी घाबरत असे’ असं वक्तव्य मनमोहन सिंग यांनी केलं होतं.

याच टीकेला आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर दिले आहे. मुख्तार अब्बास नक्वी यांनी यावर वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदींना बोलण्यासाठी कोणत्याही स्क्रिप्टची गरज नसते.” एका वृ्त्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे खोचक विधान केले.

काय म्हणाले नक्वी ?
एका वृत्तसंस्थेशी बोलाना नक्वी म्हणाले की, “मनमोहन सिंग हे एक वरिष्ठ नेते आहेत. माजी पंतप्रधान आहेत जेव्हा ते पंतप्रधान होते तेव्हा कुणा दुसऱ्याच्या सांगण्यावरुन बोलत होते. आत्ताही ते तसंच करीत आहेत. त्यांना याची जाणीव असायला हवी की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही मदतशिवाय बोलतात आणि त्यांना स्क्रिप्टची किंवा दिग्दर्शकाची गरज नसते.”
काय होतं मनमोहन सिंग यांचं वक्तव्य ?
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मनमोहन सिंग म्हणाले की, “मी सायलेंट पंतप्रधान होतो, असं मला लोक म्हणत. पण मी न घाबरता पत्रकार परिषदांना सामोरे जाणारा पंतप्रधान होतो.” मनमोहन सिंग यांनी त्यांच्या या वक्तव्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधाला आहे. एवढेच नाही तर, ‘लोक मला ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ म्हणतात, त्याचबरोबर मी ‘अॅक्सिडेंटल फायनान्स मिनिस्टर’ही होतो’ असेही ते म्हणाले होते.