PM मोदींनी IPS अधिकाऱ्यांना करुन दिली ‘सिंघम’ स्टाईलची आठवण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएसचं प्रशिक्षण पूर्ण करुन सेवेत प्रवेश करणाऱ्या देशभरातल्या 131 IPS अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यामध्ये 28 महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी जम्मू आणि काश्मीरमध्ये जाणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी अनेक सल्ले देत सूचनाही केल्या. पंतप्रधान म्हणाले, अधिकाऱ्यांनी काम करताना मानवी दृष्टीकोन ठेवावा. फक्त दंडुक्याच्या धाकाने काम शक्य नसतं. सिंघम सारखे चित्रपट पाहून काम करण्याचा प्रयत्न करु नका. त्यामुळे काही पोलीस अधिकारी हे स्वत:ला मोठे समजतात. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा बिघडते, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, काश्मीर सारख्या राज्यात काम करत असताना तिथल्या अधिकाऱ्यांनी संवाद वाढवावा. मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी आईची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची असते, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी आज हैदराबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये आयपीएस सेवेत येणाऱ्यांच प्रशिक्षण होत असतं. या अधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

पंतप्रधान म्हणाले, गुन्ह्यांची उकल करताना अधिकाऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. त्यामुळे कमी वेळात आणि अधिक चांगल्या पद्धतीने ही उकल करता येते. लोकांशी संवाद, प्रामाणिकपणा आणि कर्तव्य कठोरता या गुणांच्या बळावर अधिकारी देशाची चांगली सेवा करु शकतात, असंही ते म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत (SVPNPA) प्रशिक्षण दरम्यान अधिकाऱ्यांना कायदा, गुन्ह्यांची तपासणी, फॉरेन्सिक, नेतृत्त्व आणि व्यवस्थापन, गुन्हेगारी, सार्वजनिक सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा, मानवाधिकार, आधुनिक भारतीय पोलीस प्रणाली, जगात सुरु असलेलं संशोधन अशा सर्व प्रकारांची माहिती दिली जाते.