Assam Flood : आसाममध्ये पावसाचं तांडव ! 27 लाखाहून अधिक लोक ‘प्रभावित’, 107 जणांचा मृत्यू, PM मोदी करणार मोठी मदत

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाम प्रलयामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. यावर्षी या पुरामुळे आतापर्यंत 81 लोकांचा मृत्यू झाला आहे. पीएम मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी फोनवरून पूर परिस्थितीविषयी चर्चा केली. त्यांनी कोविड – 19 ची स्थिती तसेच ऑईल इंडियाच्या बागजन गॅस विहिरीतील आग विझविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचीही माहिती घेतली.

सोनोवाल यांनी केले ट्विट
सोनोवाल यांनी ट्वीट केले की, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी फोनवर संभाषण करून आसाममधील पूर, कोविड – 19 संबंधित परिस्थिती, बागजान तेलाच्या विहिरीत आगीच्या परिस्थितीविषयी माहिती घेतली.” ते म्हणाले, “पंतप्रधांनाही राज्याबद्दल काळजी तसेच लोकांशी एकता व्यक्त केली आणि सर्व शक्य मदतीची ग्वाही दिली. ” मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सोनोवाल यांनी जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी राज्यात आतापर्यंत घेतल्या गेलेल्या चरणांची माहिती मोदींना दिली.

पूर आणि दरड कोसळल्यामुळे 107 लोकांचा मृत्यू
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, यावर्षी पूर आणि दरड कोसळल्यामुळे राज्यात 107 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 81 जणांचा पूर-संबंधित घटनांमुळे मृत्यू झाला तर 26 जणांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला. आसामच्या 33 जिल्ह्यांपैकी 26 जिल्ह्यांमधील 27 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले असून बर्‍याच ठिकाणी घरे, पिके, रस्ते आणि पूल नष्ट झाले आहेत.

आसामवर चारही बाजूंनी संकट
आसाममध्ये कोरोना विषाणू संसर्गाची 22,981 प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी केवळ 10,503 गुवाहाटी शहरामधील आहे. राज्यात संक्रमणामुळे आत्तापर्यंत 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या 54 दिवसांपासून आसाममधील ऑईल इंडिया लिमिटेडच्या खराब झालेल्या बागजान गॅस विहीरीतून अनियंत्रित गॅस गळती सुरू आहे. 9 जून रोजी त्याला आग लागली होती.