मोदींच्या ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेला निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘मैं भी चौकीदार’ या मोहिमेला मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाकडून भाजप पक्षाला नोटीस पाठवण्यात आली असून प्रचाराचा व्हिडीओ परवानगी न घेता सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी जाब विचारण्यात आला आहे. ‘मै भी चौकीदार’ व्हिडीओ भाजपचे निवडणूक समितीचे सदस्य नीरज कुमार यांनी शेअर केला आहे त्यामुळे आयोगाने त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नीरज यांना उत्तरासाठी ३ दिवसांची मुदत

याबाबत आयोगाने सांगितले की, १६ मार्चला या प्रकरणी मीडिया सर्टीफिकेशन अँड मॉनिटरिंग समितीने भाजपला नोटीस पाठविली आहे. ‘मैं भी चौकीदार’च्या प्रचाराच्या व्हिडिओमध्ये भाजपने जवानांचेही चित्रिकरण दाखविले आहे. निवडणूक आयोगाने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सर्व पक्षांना लष्कराच्या कारवाईचा आणि त्यांच्या फोटोंचा वापर न करण्याची सक्त ताकीद दिली होती. मात्र, यानंतरही भाजपने या व्हिडिओमध्ये जवानांचा वापर केला आहे. यावर आयोगाने जोरदार आक्षेप घेतला आहे.

विरोधी पक्षाकडून सतत ‘चौकीदार ही चोर है’ या टीकेला प्रत्यत्तर म्हणून ‘मैं भी चौकीदार’ हे कॅम्पेन सुरु केले. यांचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. तर भाजप आणि मोदी प्रेमींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरील नावापुढे चौकीदार जोडले आहे.