चौकीदार झोपत नाही म्हणून चोरांची झोप उडाली

धर्मशाला : वृत्तसंस्था – चौकीदार झोपत नाही म्हणून चोरांची झोप उडाली असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. हिमाचल प्रदेशमधील भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित ‘जन आभार’ सभेत ते बोलत होते. कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेस खोटं बोलत आहे. पंजाब, कर्नाटकमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारने हिमाचल प्रदेशला सापत्न वागणूक दिली असल्याचा आरोप केला. याआधी युपीए सरकारने हिमाचलला २१ हजार कोटी रुपये दिले होते. मात्र, एनडीएचे सरकार आल्यानंतर हिमाचलमधील विकास कामांसाठी ७२ हजार कोटी रुपये दिले. भाजपच्या नेतृत्वातील हिमाचल प्रदेश राज्य सरकार या पैशांचा योग्य विनिमय करेल असा विश्वास असल्यामुळे ही रक्कम वाढवण्यात आली असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. हिमाचल प्रदेशमध्ये फक्त पर्यटन आणि शेतीआधारीत विकास होणार नसून औद्योगिक विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

काँग्रेसने ‘वन रँक, वन पेन्शन’साठी अवघ्या ५०० कोटींची तरतूद केली होती. मात्र, आमचं सरकार आल्यानंतर त्यासाठी १२ हजार कोटींची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. आमच्या सरकारने चार हप्त्यांमध्ये जवानांना या योजनेचे पैसे दिले असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला. काँग्रेसने ‘वन रँक, वन पेन्शन’ वर लोकांची दिशाभूल केली होती आणि आता शेतकरी कर्जमाफीवर दिशाभूल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या लोकांना देश लुटण्याची सवय होती त्यांना आज देशाच्या चौकीदारापासून भीती वाटत असून चौकीदाराला शिव्या देण्याचे काम सुरू केले असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली.