‘काही लोक दहशतवादाच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आलेत’, फ्रान्स कार्टून वादावर PM मोदींचं वक्तव्य

केवडिया : वृत्तसंस्था – काही लोक दहशतवादाच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत. काही दिवसात शेजारी देशातून ज्या बातम्या समोर आल्या आहेत तेथील संसदेत ज्या प्रकारे सत्य स्विकारलं गेलं त्यानं या लोकांचा खरा चेहरा देशासमोर आणला आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फ्रान्स कार्टून वादावर (France’s Cartoon Controversy) भाष्य केलं आहे. गुजरातमध्ये एकता दिवस निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पीएम मोदी म्हणाले, “आजच्या परिस्थितीत जगातील सर्व देशांना, सर्व नागरिकांना आणि सर्व पंथांना दहशतवादाविरोधात एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. शांतता-बंधुता आणि परस्पर आदराची भावनाच मानवतेची खरी ओळख आहे. दहशतवाद आणि हिंसेनं कधीही कुणाचंही कल्याण होऊ शकत नाही.” असंही ते म्हणाले.

यावेळी बोलताना मोदींनी नाव घेता काँग्रेसवर (Indian National Congress) निशाणा साधला. ते म्हणाले, “आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक कोणत्या थराला जाऊ शकतात हे पुलवामा हल्ल्यानंतर (2019 Pulwama attack) केल्या गेलेल्या राजकारणावरून स्पष्ट झालं आहे. तेव्हा काय काय बोललं गेलं, कशा प्रकारची विधानं केली गेली हे देश कधीच विसरू शकत नाही.” असंही त्यांनी सांगितलं.