Video : ‘ड्रॅगन’ला शह ! PM नरेंद्र मोदींकडून अटल बोगद्याचं उद्घाटन

पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या ‘अटल टनल’ या बोगद्याचे हिमाचल प्रदेशातील रोहतांग येथे लोकार्पण केले. या बोगद्यामुळे हिमाचल प्रदेशातील नागरिकांना फायदा होईलच, मात्र भारतीय लष्कराला रसद पुरवणे हे काम सुद्धा सोपे होणार आहे. तसेच भारतीय लष्कराला या बोगद्यामुळे पाकिस्तान आणि चीनच्या सीमेपर्यंत कोणत्याही ऋतूत सहज रसद पोहचता येणार आहे.

दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वायपेयी यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे. या बोगद्याच्या लोकार्पण सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रमुख एम एम नरवणे उपस्थित होते.

बोगद्यात असतील ‘या’ सुविधा

>> या बोगद्याची लांबी ९.०२ किलोमीटर असून पीरपंजाल डोंगररांगांना भेदून ३,३०० कोटी रुपये खर्चून हा बोगदा बनवण्यात आला आहे. हा बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवर (१०,०४० फूट) बनवण्यात आला आहे. यामुळे आता मोठ्या बर्फवृष्टी दरम्यान हिमाचल प्रदेशसोबत १२ महिने संपर्कात राहता येणार आहे.

>> बोगद्या मुळे मनाली ते लेह ४७४ किमीचे अंतर ४२४ किमी होणार आहे. हा बोगदा खोदताना कटिंग एन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. घोड्याच्या नालेसारखा याला आकार देण्यात आला आहे.

>> यामधून रोज ३००० कार आणि १५०० ट्रकची वाहतूक होऊ शकते. बोगद्यात प्रत्येक १५० मीटरवर टेलिफोन ठेवण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक ६० मीटरवर फायर हायड्रेंट तंत्रज्ञान आहे, आग लागल्यास तात्काळ नियंत्रण मिळवता येईल.

>> प्रत्येक २५० मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ते ऑटो इन्सिडेंट डिटेक्शन करतात. प्रत्येक किमीवर हवेची गुणवत्ता तपासणी आणि शुद्ध हवा आत घेण्याची सुविधा आहे. तसेच प्रत्येक २५ मीटरवर सूचना लावण्यात आल्या आहेत.