‘क्लीन इंडिया’नंतर आता ‘फिट इंडिया’ ! राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त PM मोदी सुरु करणार नविन ‘अभियान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्लीन इंडिया (स्वच्छता मोहीम) नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ‘फिट इंडिया अभियान’ देशभरात सुरू करणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (२९ ऑगस्ट) देशातील नागरिकांना तंदुरुस्तीबद्दल जागरूक करण्यासाठी ‘फिट इंडिया अभियान’ सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा पंतप्रधान करणार असून हा कार्यक्रम २९ ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये होईल. ‘खेलो इंडिया’ अंतर्गत क्रीडा मंत्रालयाच्या नेतृत्वात ही मोहीम २९ ऑगस्ट २०१९ पासून पुढील चार वर्षांत म्हणजेच २९ ऑगस्ट २०२३ पर्यंत विविध टप्प्यात सुरू ठेवली जाईल.

नेमके काय आहे ‘फिट इंडिया अभियान’ :
पंतप्रधानांनी ज्याप्रमाणे स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याची मोहीम राबविली त्याचप्रमाणे केवळ देशवासीच नव्हे तर परदेशात वास्तव्य करणारे भारतीयही ‘फिट इंडिया’ अभियानामुळे रोजच्या जीवनात तंदुरुस्त राहण्यास प्रेरित होतील. यासाठी क्रीडा मंत्रालय व भारत सरकार यांच्या वतीने सर्वसमावेशक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध खेळाडूंव्यतिरिक्त, इतर क्षेत्रांशी संबंधीत सेलिब्रिटी देखील याच्या प्रसिद्धीसाठी जोडल्या जातील. तसेच, विविध स्तरांवर स्वयंसेवकांची टीमही तयार केली जाईल. फिटनेससाठी ऑडिओ व्हिज्युअल, प्रिंट साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. फिट इंडिया मोहिमेचे मोबाइल अ‍ॅप सुरू करण्याबरोबरच वेब पोर्टल आणि सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला जाईल. अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील. ही मोहीम केवळ खेळाडूंसाठीच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकासाठीही असणार आहे. ११ ऑगस्ट रोजी एका मुलाखतीत क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी यासंदर्भात माहिती दिली होती.

क्रीडामंत्री राज्यांशी करणार चर्चा :
क्रीडा मंत्री किरण रिजिजू या अभियानाचे यश पहाण्यासाठी आणि मूलभूत स्तरावर राबविण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्री व क्रीडा मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या मोहिमेवर लक्ष ठेवून त्याची योग्य अंमलबजावणी करण्याचे क्रीडामंत्री सर्व राज्यांना निर्देश देतील.

दरवर्षी होणार विविध फिटनेस कार्यक्रम :
या चार वर्षांच्या मोहिमेमध्ये दरवर्षी ठराविक उद्दिष्ट ठेऊन फिटनेस जनजागृती अभियान राबविले जाईल. सन २०२०-२१ मध्ये खाण्याच्या सवयीबद्दल, सन २०२०-२१ मध्ये इको-फ्रेंडली जीवनशैली, दीर्घावधी जीवन, २०२२-२३ मध्ये चांगले आरोग्य, जीवनशैली, आरोग्यासाठी अनुकूल गोष्टी आणि सेवा या व्यतिरिक्त, आपल्याला आजारांपासून दूर राहण्याचे मार्ग याद्वारे सांगितले जातील.

आरोग्यविषयक वृत्त –