गुजरात दंगलीतील 3 खटल्यांतून PM नरेंद्र मोदी यांचं नाव वगळलं

साबरकांठा : वृत्तसंस्था – गुजरातमधील साबरकांठा जिल्हातील तालुका न्यायालयाने २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीप्रकरणी पीडितांच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाईसाठी दाखल केलेल्या तीन खटल्यातून प्रतिवादी म्हणून असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव काढून टाकण्यात आले आहे. ब्रिटिश परिवाराने दंगलीत मारल्या गेलेल्या आपल्या तीन नातेवाईकांसाठी हा खटला दाखल केला होता.

नरेंद्र मोदी यांचे नाव यामध्ये समावेश करण्याचा कोणताच तर्क आणि योग्य कारण नसल्याचं निर्वाळा देत वरिष्ठ न्यायाधीश एस. के. गढवी यांनी मोदींचे नाव वगळण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या मतानुसार, नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध फिर्यादी पक्षाने केलेले आरोप संदिग्ध तसेच कानावर पडलेल्या गोष्टींच्या आधारे करण्यात आले आहेत. या आरोपांच्या पुष्टीबाबत फिर्यादी पक्षाने कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. दंगलीत ठार झालेल्यांच्या वारसदारांना भरपाई मिळण्यासाठी हे दिवाणी खटले दाखल केले होते. मोदी यांचे प्रतिवादी म्हणून असलेले नाव खटल्यातून वगळण्यात यावे, अशी विनंती त्यांच्या वकिलांतर्फे न्यायालयात करण्यात आली.

तथापि, विशेष न्यायालयाने या तीन खटल्यात प्रतिवाद्यांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त यापूर्वी निर्दोष मुक्तता केलेलं गुजरातचे माजी गृहमंत्री गोरधन झडपिया, गुजरातचे माजी पोलीस महासंचालक के. चक्रवर्ती, गृहखात्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिन अशोक नारायण, माजी आयपीएस अधिकारी अमिताभ पथक, पोलीस निरीक्षक डी. के. वणीकर व गुजरात सरकारचा समावेश आहे.

काय घडले होते ?
ब्रिटन स्थित असलेले इम्रान दाऊद हे आपले काका सईद दाऊद, शकील दाऊद व मोहम्मद अस्वात यांच्याबरोबर २८ फेब्रुवारी २००२ रोजी भारतात आलेला. त्यांनी जयपूर, आग्रा बघितल्यानंतर गुजरातला जातेवेळी साबरकांठा जिल्हातील लाजपूर गावी रस्त्यात त्यांची गाडी अडवण्यात आली. यामध्ये सईद, अस्वात आणि गाडीचा चालक युसूफ पिरघर याला दंगलखोरांनी ठार केले तर शकील बेपत्ता झाले. त्यांचा पत्ताच न लागल्याने ते मृत म्हणून गृहीत धरण्यात आले.