International Women’s Day : महाराष्ट्रातील ‘विजया पवार’ यांनी चालवलं पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले ट्विटर अकाऊंट देशाच्या विविध भागातील 7 महिलांना चालविण्यास दिले होते. यामध्ये महाराष्ट्रातील बंजारा समाजातील एका महिलेलाही संधी मिळाली होती. या महिलेचे नाव विजया पवार असून त्या मागील दोन दशकांपासून गोरमाटी कला क्षेत्रात काम करत आहेत.

ज्या महिलांची यशोगाथा जगासाठी प्रेरणास्त्रोत आहे, अशा महिलांच्या हाती महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले ट्विटर अकाऊंट सोपवले होते. महाराष्ट्रातील बंजारा समाजातील महिलेला ही संधी मिळाली. हस्तकला आणि या कलेचा लघुउद्योग सुरू करणार्‍या महिलांची यासाठी निवड करण्यात आली होती. गोरमाटी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदतही केल्याचे विजया यांनी सांगितले.

पंतप्रधानांचे ट्विटर अकाऊंट हँडल करण्याची संधी मिळालेल्या महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या विजया पवार म्हणाल्या, मी लहानपणापासूनच हस्तकला शिकले. घरातूनच हा वारसा मिळाला. लग्नानंतरही हस्तकलेचे काम सुरूच ठेवले. पती आणि सासूने मला खूप पाठिंबा दिल्याने 2004 मध्ये स्फुर्ती क्लस्टर नावाने एनजीओची स्थापना केली. घर, गाव आणि आता तालुका पातळीवर आम्ही हे काम करत आहोत. प्रत्येक बंजारा तांड्यात जाऊन महिलांना यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करत आहोत.

विजया पवार म्हणाल्या, आंबेडकर हस्तशिल्प योजनेतून आम्हाला कार्यक्रम राबवता आला. यामध्ये 642 महिलांचा समावेश आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातून महिलांना रोजगारनिर्मिती कशी करावी, हेही शिकवले. आज सुमारे 450 महिला काम करत असून 150 महिला स्वत:चा छोटा व्यवसाय चालवत आहेत.

या कार्याची दखल घेऊन महिला दिनी पंतप्रधानांनी ट्विटर हँडल चालवण्यासाठी निवड केली होती. हा माझ्यासाठी मोठा गौरव आहे. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते, असे विजया पवार म्हणाल्या.